
तिसरी भाषा व त्याआडून हिंदी सक्ती लादण्यासाठी नेमलेली नरेंद्र जाधव समितीच रद्द करण्यात यावी व त्या समितीने हिंदी व तिसरी भाषा लादणारा अहवाल दिला, तरी हिंदी भाषा सक्ती लादणार नाही, याचे अभिवचन सरकारने द्यावे, असा ठराव रविवारी 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात करण्यात आला.
‘ज्ञानपीठ’ विजेते ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी हिंदी सक्ती विरोधातील ठराव करण्यात आला. हिंदी भाषा सक्तीला सर्व स्तरांवरून झालेल्या प्रचंड विरोधामुळे तो निर्णय सरकारने तात्पुरता मागे घेतला असला तरी तिसरी भाषा व त्याआडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न सरकारने सोडलेला नाही. उलट तिसरी भाषा लादण्यासाठी नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. म्हणून ही समितीच रद्द करण्यात यावी व त्या समितीने हिंदी व तिसरी भाषा लादणारा अहवाल दिला तरी हिंदी भाषा सक्ती लादणार नाही, याचे अभिवचन सरकारने द्यावे, अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली आहे. राज्यातील मराठी माध्यमाच्या 14 हजार शाळा, समूहशाळा करण्याच्या नावावर समायोजित करून बंद केल्या जाणार आहेत. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे मराठी शाळा वाचवा असा ठराव ठरवण्यात आला.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’, सीमाभाग महाराष्ट्रात घेणे, मराठी शाळा, ग्रंथालये वाचवण्याच्या अनुषंगाने पावले उचलली जावीत, अशी लोकभावना व्यक्त करणारे एकूण 17 ठरावही करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
सीमाभाग महाराष्ट्रात सामील करा
महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील गावांचा प्रश्न तातडीने सोडवण्यात यावा, अशी मागणीचा ठराव घेण्यात आला. खेडे घटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष बहुभाषिकता व लोकेच्छा या सर्वमान्य तत्त्वांचा अवलंब करून वादग्रस्त सीमा भाग महाराष्ट्रात सामील करावा, असा ठराव करण्यात आला.
शंभरावे संमेलन पुण्यात
पुढील वर्षी होणारे शतक महोत्सवी साहित्य संमेलन पुण्यात होईल, अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केली. 1878 साली पुण्यात पहिले ग्रंथकार संमेलन झाले. हे वर्तुळ पुढील वर्षी पूर्ण होईल. महाराष्ट्र साहित्य परिषद या संमेलनाचे आयोजन करेल, असे त्यांनी सांगितले.


































































