
महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंध होऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आघाडीच्या बहुतांश उमेदवारांचा नवखा चेहरा असूनही त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने सत्ताधारी गटात अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, अनेक प्रभागांतील राजकीय गणिते त्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा कस पणाला लागला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू झाले आहे. प्रत्येक प्रभागांत स्वतंत्रपणे तसेच
पॅनलच्या माध्यमातून प्रचार रॅली काढण्यात येत आहे. असून, काही उमेदवारांनी अहिल्यानगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.
महाविकास आघाडीतील उमेदवारांनी एकसंध राहून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. बहुतांश उमेदवार नवखे असल्याने परस्पर समन्वय महत्त्वाचा ठरत आहे. अनेक प्रभागांत नव्या चेहऱ्यांमुळे सत्ताधाऱ्यांसमोर अडचणी वाढल्या असून, विद्यमान व माजी नगरसेवकांनी केलेली विकासकामे प्रत्यक्षात दिसत नसल्याचा आरोपही पुढे येत आहे. तसेच राज्य सरकारच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न काही नगरसेवकांकडून होत असल्याची टीकाही होत असून, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुस्लिम उमेदवार मोठय़ा संख्येने रिंगणात उतरले असून, त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. आजूबाजूच्या भागांतील माजी नगरसेवकही पुन्हा रिंगणात उतरल्याने चुरस वाढली आहे.
———————————
सांगलीत 170 रणरागिणी रिंगणात
स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षणामुळे महिला बऱयापैकी राजकारणात स्थिरावल्या आहेत. सांगली महानगरपालिका निवडणुकीत एकूण 170 महिला उमेदवार आहेत. विशेष बाब म्हणजे, आरक्षणाच्या चौकटीबाहेरील म्हणजे खुल्या जागाही त्या पटकावू लागल्या आहेत. आरक्षणाचे रिंगण तोडून आठ महिला लढत देणार आहेत. या महिलांना भाजप, राष्ट्रवादी, ‘वंचित’सह प्रमुख पक्षांनी संधी दिली आहे. यात दोन माजी नगरसेविका आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत 381 उमेदवार असून, यात 170 महिलांना संधी मिळाली आहे. यात प्रमुख पक्षांकडून 128, तर 42 महिला अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

























































