
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यावरून झालेल्या खुनी हल्ल्यात मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच भाजपच्या दडपशाहीविरोधात महाविकास आघाडीकडून
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपच्या राक्षसी प्रवृत्तीला लोकशाही मार्गानेच विरोध करणार असल्याचा ठाम निर्धार खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे, शिवसेना पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, जिल्हाप्रमुख अजय दासरी, माजी आमदार कॉ. आडम मास्तर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महेश गादेकर, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, विनायक महिंद्रकर व महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून झालेल्या खुनी हल्ल्यात एका युवकाचा बळी गेला आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी असून, त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पैसा आणि सत्ता या पलीकडे जाऊन आता रक्तपातावर भाजपचे राजकारण आले आहे. सोलापूरकरांना भाजपचा खरा चेहरा दिसून आला असून, सत्तेसाठी दोन कुटुंबांमध्ये भांडणे लावून एका युवकाचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

























































