ना घर ना दुचाकी, महिला उमेदवाराच्या खात्यात केवळ दोन हजार रुपये

महापालिका निवडणुकीत अनेक श्रीमंत उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या राजकीय बळासोबतच तसेच आर्थिक क्षमतादेखील चर्चेत आहे. त्याच वेळी प्रभाग 37मधील एका महिला उमेदवाराच्या खात्यात अवघे दोन हजार रुपये असून त्यांच्या नावावर ना घर आहे ना साधी दुचाकी. त्यांच्याकडे चार चाकी वाहनदेखील नाही. तेजश्री भोसले असे त्यांचे नाव आहे. त्यांनी निवडणूक आयागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडील संपत्तीची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रभागात 27 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोटय़धीश आहेत.

 

मतदान जवळ येताच उमेदवारांना आठवले दूरचे नातेवाईक

महापालिकेच्या मतदानासाठी आता केवळ 11 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली असून आपल्या नातलगांना फोनाफोनी करून मदतीसाठी बोलावणे धाडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येताच अनेक दिवसांपासून बोलणे नसलेले नातेवाईक उमेदवारांना आता आपली माणसे असल्याचे जाणवले आहे. उमेदवारांची पत्नी, भाऊ, बहिणी, चुलते आदींनी वेगवेगळी कामे हाती घेतली आहेत, तर ग्रामीण भागातील नातेवाईकांनाही शहरात येऊन जा, असे निरोप पाठविले जात आहेत.