
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे धक्कादायक वक्तव्य करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. लिहिलेले पुसता येते मात्र, कोरलेले नाही, अशा शब्दात रितेश देशमुख याने रवींद्र चव्हाण यांना सुनावले. चव्हाण यांच्या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून टीकेचा भडीमार झाल्यानंतर चव्हाण यांना माफी मागायची वेळ आली. दरम्यान, त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आले.
काँग्रेसकडून संतप्त प्रतिक्रिया
चव्हाण यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्व. विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूर जिह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आहेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तर, जनमानसाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्याची भाषा म्हणजे भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीची स्पष्टता आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
रितेशकडून चार शब्दांत समाचार
सोशल मीडियामध्ये पोस्ट केलेल्या व्हिडीओत रितेश देशमुख म्हणाले, दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावे मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येते. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.
चव्हाण यांचा सपशेल माफीनामा
रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरुन राज्यात ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. लातुरमध्ये चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यावर माफी मागायची वेळ आली. मी विलासरावांवर कोणत्याही पद्धतीने टीका केली नव्हती. मात्र, देशमुख कुटुंबियांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण यांची लातुरमध्ये सभा झाली. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले होते. त्यावर काँग्रेसचे आमदार आणि विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी टीका केली. चव्हाण यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि व्यथित करणारे असून भाजपची नितीमत्ता दिवाळखोरीत निघाल्याचा आरोप अमित देशमुख यांनी केला. त्यानंतर रितेश देशमुख यांनी आज सकाळी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून संयमित शब्दांमध्ये चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.





























































