
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. रामदास विठ्ठल माने असे या उमेदवाराचे नाव आहे. या उमेदवाराने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात म्हटले की, मी अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवत आहे, परंतु मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी पिस्तूल दाखवून धमकावले आहे, असा आरोप केला आहे. मी निवडणुकीला उभे राहिल्यापासून मला विविध अडथळे येत आहेत. माझ्या मागे प्रतिस्पर्धी पक्षांचे कार्यकर्ते येतात. बंदूक दाखवतात. मागील 3 ते 4 दिवसांपासून मला बंदूक दाखवणे, उमेदवारी अर्ज मागे घे म्हणून धमकावणे, माझ्या प्रचारात विविध अडथळे आणण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकाराला पोलिसांचीही मूकसंमती मिळत आहे. आमच्याकडे काम करणाऱ्या बिहारी कामगारांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याने ते निघून गेले. पोलीस पिस्तूल दाखवून धमकावत असतील तर हा लोकशाहीचा गळा आवळल्यासारखे आहे, असे रामदास माने यांनी म्हटले आहे.
शिवसेनेकडून संताप
या सर्व प्रकारावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक 1 मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिवाल्वरचा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली त्याची ही आपबीती, असे त्यांनी माने यांचा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटले आहे.




























































