
आधीच विविध शिक्षणबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेल्या शिक्षकांवर आता आणखी एक जबाबदारी लादण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक शाळेत परिसर स्वच्छता व सुरक्षेसाठी एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्याचे परिपत्रक शिक्षण आयुक्तालयाने काढले असून, शाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याची जबाबदारीही त्या शिक्षकावर टाकण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र निषेध नोंदवित परिपत्रक मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
देशभरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांचे परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये परिसर स्वच्छता व सुरक्षेसाठी ‘नोडल अधिकारी’ नेमण्याचे परिपत्रक काढले. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही हे परिपत्रक जारी केले आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकाचे नाव व संपर्क क्रमांक शाळेच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दर्शविणे, तसेच स्थानिक महापालिका अथवा संबंधित प्रशासकीय यंत्रणेला कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळेच्या आवारात भटकी कुत्री शिरू नयेत किंवा तेथे त्यांचा निवारा होऊ नये, याची जबाबदारीही या शिक्षकावर सोपविण्यात आली आहे.
या निर्णयावर शिक्षक संघटनांनी कडाडून टीका केली आहे. शालेय परिसराची स्वच्छता, देखभाल व भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असून, प्रशासनातील अपयश झाकण्यासाठी शिक्षकांवर शिक्षणाशी असंबंधित कामे लादली जात असल्याचा आरोप शिक्षक संघाचे (संभाजीराव गट) जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी केला. असे आदेश मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘बिबट्यांनाही आम्हीच हुसकावायचे काय?’
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. एकीकडे शिक्षणमंत्री शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे कमी करण्याची ग्वाही देतात, तर दुसरीकडे अधिकारी शिक्षकांना नवनव्या अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकवत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. कोरोना काळात शिक्षकांना दारूच्या दुकानांबाहेरील गर्दी नियंत्रणासाठी नेमण्यात आले होते, तर आता भटक्या कुत्र्यांना हाकलण्याची जबाबदारी दिली जात आहे. उद्या सरकार आम्हाला बिबट्यांनाही हुसकावायला सांगणार का, असा संतप्त सवाल शिक्षक नेते भास्कर नरसाळे यांनी उपस्थित केला.
शालाबाह्य कामांसाठी शिक्षकच का?
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांचे असताना शिक्षकांनाच वारंवार शालाबाह्य कामांसाठी लक्ष्य केले जात असल्याची खंत शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद कोतकर यांनी व्यक्त केली. सर्वच शालाबाह्य कामांसाठी शिक्षकच का दिसतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.































































