उमेदवारांना बिनविरोध घोषित करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा! वृषाली पाटील, सत्वशीला शिंदेंविरोधात शिवसेना, मनसेची पालिकेवर धडक

ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाच्या सहा उमेदवारांना बिनविरोध करणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी वृषाली पाटील, सत्वशीला शिंदे यांची भूमिका संशयास्पद आहे. या वादग्रस्त अधिकारी अद्याप मोकाट असल्याने शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. उमेदवारी अर्जामध्ये घोळ घालणाऱ्या या वादग्रस्त अधिकाऱ्यांवर २४ तासांत कारवाई न केल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठाण्यात प्रथमच सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. या विराधात शिवसेना, मनसेने आवाज उठवले आहे. वृषाली पाटील या प्रभाग क्रमांक १६, १७, १८ च्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. त्यांची एकूण कार्यपद्धती संशयास्पद राहिली आहे. अनेक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळेस बेकायदेशीर व बेजबाबदारपणे त्यांनी अवैध ठरविले. तसेच सत्वशीला शिंदे या प्रभाग क्रमांक ४, ५, ७च्या निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दीप्ती जाबर यांचा उमेदवारी अर्ज कपट कारस्थान करून अवैध ठरवला. त्यांनी शिंदे गटाच्या सुलेखा चव्हाण यांना बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा केला. या बिनविरोध निवडीमागे मोठे षडयंत्र असून त्याला दोन्ही अधिकारी पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शहरप्रमुख अनिश गाढवे उपस्थित होते.

२४ तासांचा अल्टीमेटम

बिनविरोध निवडणुकीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला तर महापौरदेखील बिनविरोध बसेल अशी भीती व्यक्त करून वादग्रस्त अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अविनाश जाधव यांनी २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे.