
महापालिकेतील कामांचे ठेके आणि रिडेव्हलपमेंटवर डोळा ठेवून शिंदे गट आणि भाजपने प्रस्थापितांवर तिकिटांची खैरात केली आहे. सुमारे ५८ उमेदवारी कुटुंबकबिल्यांच्या घशात घातल्या आहेत. मात्र या प्रस्थापितांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निष्ठावंतांनी अक्षरशः घाम फुटला आहे. इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सोसायटीत आपला बिल्डर घुसवण्यासाठी रहिवासी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना हैराण केले आहे. त्यामुळे या कुटुंबकबिल्यांचा जनाधार घटल्याने कोपरखैरणे, तुर्भे, सीवूडमध्ये चित्र पालटणार आहे.
कोपरखैरणे येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपने माजी महापौर सागर नाईक आणि नाईक कुटुंबातील अन्य सदस्यांना उतरवले आहे. त्याच प्रभागात शिंदे गटाने सिटिंग नगरसेवक रामदास पवळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र पवळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यामुळे या प्रभागातील ‘अ’ गटात दुरंगी लढत रंगणार असून सागर नाईक यांचा सामना शिवसेनेचे राजेंद्र आव्हाड यांच्याशी होणार आहे. आव्हाड यांचा या भागात जनाधार मोठा आहे. त्यांच्या प्रचार रॅलींना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच प्रभागात ‘ब’ गटात असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार कविता थोरात यांच्या प्रचार फेरीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याने भाजप आणि शिंदे गटाची पळापळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधून शिंदे गट आणि भाजपने या ठिकाणी उमेदवारी देताना डी. आर. पाटील आणि विलास भोईर या प्रस्थापितांच्या कुटुंबांना प्राधान्य दिले आहे. शिवसेनेने याच प्रभागातून दिव्या राठोड, निशा पवार, संकेत डोके, मनसेने विकास पाटील या निष्ठावंतांना रिंगणात उतरवले आहे. दिव्या राठोड या शिवसेनेचे माजी उपशहरप्रमुख सोमा घरत यांच्या सून आहेत. घरत यांना या भागात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पाटील आणि भोईर कंपनीची डोकेदुखी वाढली आहे.
सीवूडमधील प्रभाग क्रमांक २६ मध्ये शिवसेनेने उपशहरप्रमुख समीर बागवान, विभागप्रमुख विशाल विचारे, सुलक्षणा भोईर आणि मनसेने रेखा आयवळे यांना उमेदवारी दिली आहे. समीर बागवान यांचा गेल्या निवडणुकीत फक्त तीन मतांनी पराभव झाला होता. भाजपने जरी या निवडणुकीत प्रस्थापितांना उतरवले असले तरी शिंदे गटाने मात्र भाजपमधून आयात झालेल्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात प्रचंड नाराजी आहे.





























































