
लहान मुलांसाठी प्रोसेस्ट फूड तयार करणारी जगातील सर्वात मोठी अन्न उत्पादक कंपनी नेस्ले सध्या मोठ्या संकटात सापडली आहे. नेस्लेच्या लहान मुलांच्या दूध पावडरमध्ये ‘सेरूलॉइड’ नावाचे अत्यंत घातक विषारी घटक आढळल्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नेस्लेने युरोपसह तब्बल 25 देशांधून आपली कोट्यवधी रुपयांची उत्पादने परत मागण्याचा (रिकॉल) निर्णय घेतला आहे. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा ‘रिकॉल’ असल्याची चर्चा आहे.
नेस्लेने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या त्यांच्या उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालामध्ये तांत्रित बिघाडामुळे दूषित घटक मिसळले असावेत अशी शक्यता आहे. एका पुरवठादाराकडून याबाबत माहिती मिळताच कंपनीने तपासणी केली असता काही बॅचेसमध्ये Bacillus cereus या बॅक्टेरियापासून तयार होणारे ‘सेरुलॉइड’ हे विषारी घटक आढळल्याचे निदर्शनास आले.
नेदरलँड्समधील एका कारखान्यात हा धोका पहिल्यांदा निदर्शनास आला असून त्याचे धागेदोरे आता 10 हून अधिक कारखान्यांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे लहान मुलांना उलट्या, मळमळ आणि पोटाचे विकार होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ‘सेरुलॉइड’ हे विषारी घटक उष्णतारोधक असल्याने उकळत्या पाण्यातही नष्ट होत नाहीत, असे ब्रिटनच्या फूड स्टँडर्डस एजन्सीने स्पष्ट केले आहे. यामुळे जगभरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही उत्पादनं झाली प्रभावित
नेस्लेने जगभरातून परत मागवलेल्या उत्पादनांमध्ये SMA, BEBA आणि NAN Formula सारख्या लोकप्रिय उत्पादनांचा समावेश आहे. जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, ब्रिटन या युरोपिय देशांसह तुर्की आणि अर्जेंटिनामध्ये ही उत्पादने लोकप्रिय आहे. नेस्लेच्या ‘रिकॉल’मुळे या देशातील विक्रीवर परिणाम झाला आहे. उत्पादनं परत मागवल्यामुळे नेस्लेच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. दरम्यान, या उत्पादनांमुळे मुलांना गंभीर लक्षणं दिसल्याचे वृत्त नाही. मात्र सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंपनीने वेबसाइटवर बाधित उत्पादनांचे ‘बॅच कोड’ जाहीर केले आहेत.
पालकांना आवाहन
जर तुम्ही नेस्लेचे वरीलपैकी कोणतेही उत्पादन वापरत असाल, तर तात्काळ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमच्याजवळील डब्याचा ‘बॅच नंबर’ तपासावा. जर तो नंबर बाधित यादीत असेल, तर ते उत्पादन लहान मुलांना देऊ नका, असे आवाहन कंपनीने केले आहे. तसेच नेस्लेने ही उत्पादने परत घेऊन ग्राहकांना पूर्ण पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे.





























































