दहा रुपयांत खुर्ची आणि पंधरा रुपयांत वडापाव.. निवडणूक खर्च मर्यादेमुळे उमेदवार हवालदिल; वाढत्या महागाईत १५ लाखही अपुरे पडू लागले

राजकारणात ‘खुर्ची’ मिळवण्यासाठी उमेदवार कितीही पैसे मोजायला तयार असतो; मात्र निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या खुर्चीचे भाडे निवडणूक आयोगाने प्रतिदिन अवघे दहा रुपये निश्चित केले आहे. दहा रुपयांत खुर्ची कुठून आणायची, दहा रुपयांत चहा आणि पंधरा रुपयांत वडापाव कसा द्यायचा, असा सवाल आता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना पडला आहे.

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा जाहीर केली आहे. अ वर्ग महापालिकांसाठी – मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये – ही मर्यादा १५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. इतर शहरांसाठी १३ लाखांपासून ९ लाख रुपयांपर्यंत खर्चाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या मर्यादेसोबतच प्रचारात कार्यकर्त्यांसाठी चहा-कॉफी, नाश्ता, तसेच झेरॉक्स, फ्लेक्स, बॅनर, एलईडी दिवे, मंडप, पोडियम यांसारख्या साहित्यावर किती खर्च करायचा, याचे दरही आयोगाने ठरवून दिले आहेत. मात्र मुंबईसारख्या महागड्या शहरांमध्ये हे दर पूर्णपणे अव्यवहार्य असल्याचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

खुर्चीचा दर चाळीस रुपये

निवडणूक आयोगाने प्लास्टिक खुर्चीचा दर प्रतिदिन दहा रुपये निश्चित केला आहे. प्रत्यक्षात डेकोरेटरकडून एक खुर्ची एका दिवसासाठी चाळीस रुपये मोजावी लागते. व्यासपीठावरील पोडियमचा दर आयोगाने २०० रुपये दाखवला असला, तरी बाजारात तो किमान ५०० रुपयांपर्यंत जातो.

‘वडापाव’चे दिवस गेले

पूर्वी कार्यकर्ते वडापाववर प्रचार करत होते; मात्र ते दिवस आता राहिले नसल्याचे उमेदवार सांगतात. आयोगाने एका वडापावचा दर १५ रुपये निश्चित केला आहे, तर सध्या साध्या वडापावची किंमतही २० रुपये झाली आहे. दूरवर ‘किर्ती’ पसरलेला वडापाव तर ३५ ते ४० रुपयांपर्यंत मिळतो.

झेरॉक्सचा दर फक्त ४० पैसे

सध्या ए-फोर कागदावर एका झेरॉक्सचा दर किमान दोन रुपये आहे. मात्र निवडणूक आयोगाने हा दर अवघा ४० पैसे ठेवला आहे. फ्लेक्स, बॅनर आणि हँडबिलसाठी निश्चित करण्यात आलेले दरही अनेक वर्षांपूर्वीचे असून, सध्याच्या महागाईशी त्यांचा काहीही मेळ बसत नाही.

मिसळपाव-ऑम्लेट २५ रुपयांत कुठे मिळते?

पोहे, उपमा, शिरा, इडली-सांबार, मिसळपाव, भेळ, अंडा-ऑम्लेट यांचा दर आयोगाने प्रत्येकी २५ रुपये निश्चित केला आहे. मात्र आजच्या घडीला मिसळपाव किंवा ऑम्लेट २५ रुपयांत कुठे मिळते, असा सवाल निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.