चाकू हल्ल्यानंतर काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. काल मंगळवारी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यानंतर त्यांना अकोट येथून उपचारासाठी अकोल्याला हलवण्यात आले होते.

मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास हिदायत पटेल हे नमाज पठणासाठी मोहोळा येथील मस्जिदमध्ये गेले होते. नमाज पठणानंतर काही हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अकोला येथील मोठय़ा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिदायत पटेल यांच्या मृत्यूनंतर अकोल्यातील अकोटमध्ये पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.