
नागरिकांनी रस्त्यावरुन चालताना व वाहन चालविताना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन तसेच रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ते मिरकरवाडा या मार्गावर आज रस्ता सुरक्षा रॅली काढण्यात आली.
विना हेल्मेट दुचाकी चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात. रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. योग्य रितीने वाहन पार्किंग करणे या रस्ता सुरक्षेच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी सांगितले. समाज, कुटूंब, मित्र परिवार यांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती देवून जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी, प्रत्येकाने वाहन चालवताना हेल्मेट वापरावे जेणेकरुन दुचाकी चालविताना स्वत:ची तसेच आपल्या कुटूंबाची काळजी घेतली जाईल तसेच नागरिकांनी रस्ता सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालविताना शिस्तीचे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा आणि चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्ट लावण्याची खबरदारी घ्यावी, असे सांगितले. अतिवेगाने, वाहन चालविताना मोबाईलचा करु नये, दारु पिवून वाहन चालवू नये. रस्त्यावरुन वाहन चालविताना स्वत:ची तसेच इतरांची काळजी घ्यावी. रत्नागिरी अपघातमुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी करुया, असे आवाहन करपे यांनी केले. रॅलीमध्ये पोलीस विभाग आणि उपप्रादेशिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.


























































