भाजप पाठोपाठ शिंदे गटाचे एमआयएमशी ‘गॅटमॅट’, परळी नगरपालिकेत युती, मुबारक म्हणत दानवेंनी मिध्यांना डिवचलं

भारतीय जनता पक्षानंतर आता शिंदे गटाने सत्तेसाठी एमआयएमशी युती केली आहे. बीड जिल्ह्यातील परळ नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र आले आहेत. याआधी भाजपनेही अकोटमध्ये सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली होती. नेहमी शिवसेनेला हिंदुत्व शिकवणाऱ्या भाजप, मिंधे गटाच्या ढोंगाचा पर्दाफाश झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनीही नवी युती मुबारक म्हणत शिंदे गटाला डिवचले.

अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर पोस्ट करत परळीतील युतीवरून शिंदे गटावर हल्ला चढवला. परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या ‘बंड’ आणि ‘तत्त्वांच्या’ गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट ‘एमआयएम-वासी’ झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? ​परळीतल्या या नव्या ‘सत्तेच्या संसाराचा’ चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले असून यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टॅग केले आहे.

दरम्यान, याआधी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाने एमआयएमशी हातमिळवणी केली होती. अकोटमधील युतीमुळे हेच का भाजपचे हिंदुत्व? असा संतप्त प्रतिक्रिया राज्यभरातून उमटवल्या होत्या. त्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही युती तोडण्यात आली.

सामना अग्रलेख – भाजपची सुंता!

परळीत नक्की काय घडलं?

बीडच्या परळीमध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण पाहायला भेटले आहे. एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदेगटाने गटनेता निवडीत युती केली आहे. नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह आरोप करत निवडून आलेल्या एमआयएमच्या सदस्याचा समावेश करण्यात आल्यामुळे याची चर्चा सुरूय

परळी नगरपरिषद निवड जिल्हाधिकारी बीड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मित्रपक्ष, अपक्ष – 2 अशा 24 जणांचा समावेश आहे. या मित्र पक्षांमध्ये एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचा समावेश असून उर्वरित सदस्यांमध्ये अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एमआयएमच्या उमेदवार शेख आयेशा मोहसीन यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी सभा घेतली होती. या सभेत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत शेरेबाजी केली होती. या सभेने त्या प्रभागात काँग्रेस आणि एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. आता हेच एमआयएमचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात सामील झाले आहेत.