
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये दणक्यात पार पडली. या सभेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. कुंभच्या निमित्ताने जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही. कुंभाच्या निमित्ताने ५० हजार कोटींची कामं निघाली आहेत. ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळताहेत. आणि कुठल्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आली आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी यावेळी चढवला.
ही ऐतिहासिक सभा आहे आणि या सभेमध्ये मशाली पेटलेल्या आहेत. इंजिन पुढे निघालेलं आहे. आणि त्या इंजिनाला आणि मशालीला उर्जा देण्याचं काम मैदानात जमलेले लाखो मराठी बांधव, शिवसैनिक आणि मनसैनिक देत आहेत. अत्यंत अभिमान बाळगावा अशी ही सभा आहे. माननीय उद्धव ठाकरे आणि आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली, यातच नाशिकचं महत्त्व आपल्याला कळलं असेल. उद्धवजी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं ही फक्त राजकीय घडामोड नाही तर महाराष्ट्राच्या मनातली आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे. राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे ही आग बाहेर पडण्याची संधी आपल्याला मिळतेय, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
हे नाशिक क्रांतिकारकांची भूमी आहे. ही नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे आणि ही नाशिक प्रभू श्रीरामाची भूमी आहे. पण या नाशिकमध्ये जे प्रश्न आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहेत. कुंभनगरी, लवकरच इथे कुंभमेळा होईल. आणि या कुंभच्या निमित्ताने जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही. कुंभाच्या निमित्ताने ५० हजार कोटींची कामं निघाली आहेत. आणि ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळताहेत. मग महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी काय करायचं? नाशिकमधल्या स्थानिक लोकांनी काय करायचं? ५० हजार कोटींची कामं गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदारांना देत असेल आणि कुठल्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आली आहे, अशी तोफ संजय राऊत यांनी डागली.
जी आश्वासनं आतापर्यंत नाशिकच्या बाबतीत आतापर्यंत आपल्याला मिळाली ती सगळी फोल ठरली. नाशिक स्मार्ट करणार होते. १०० जी शहरं काढली होती स्मार्ट सिटी बनवण्यासाठी त्यामध्ये नाशिक होतं. आणि ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत स्मार्ट सिटीचं काम पूर्ण करण्याचा निर्णय झालेला होता. पण आजही नाशिकची अवस्था ही पाटणा आणि लखनऊ पेक्षाही वाईट आहे. रस्ते बघा, पाणीपुरवठ्याचे प्रश्न बघा, नाशिकमध्ये पाच-पाच दिवस पाणी मिळत नाही लोकांना, पाण्याचं खासगीकरण करण्याचा विषय सुरू आहे, कोणासाठी तर ठेकेदारांसाठी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. दत्तक घेऊन केलं काय? सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी या नाशिक शहराची केली, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी लगावला.
आज नाशिक शहरामध्ये सगळ्या जास्त उपलब्ध असेल तर, ते अमली पदार्थ, ड्रग्ज आहे. शाळा आणि कॉलेजच्या टपरीबाहेर, जाल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचलं जातंय. आणि याचा सामना करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नाशिक शहरात सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं. हे यासाठी सांगतोय, ज्यांच्या हातामध्ये आपण नाशिकची सूत्रं गेल्या दहा वर्षांपासून दिलेली आहेत त्यांनी नाशिक शहराचा पूर्ण सत्यनाश केला, विल्हेवाट लावली. म्हणून आज या व्यासपीठावर जी ताकद तुम्हाला दिसतेय ती ताकद तुम्ही विजयी करा नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा. आणि या नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा. जसं नाशिक तुम्हाला आपेक्षित आहे तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धवसाहेब आणि माननीय राजसाहेब हे पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी नाशिककरांना दिला.
गेली अनेक वर्षे ऐकतोय, नाशिक शहरात आयटी पार्क होणार, आयटी पार्क होणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता. त्याचं काय झालं? कुंभच्या निमित्ताने तपोवनामध्ये दोन हजारच्या आसपास झाडांची कत्तल केली. हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना सांगू इच्छितो, नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येत धर्मध्वजा फडकवली. त्या धर्मध्वजेवर झाडाचे चित्र आहे. आणि या श्रीरामा तुम्ही दोन हजार झाडांची कत्तल केली. ज्या ठिकाणी ही झाडं तोडलेली आहेत आज ती संपूर्ण जमीन भविष्यामध्ये बिल्डरांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे. कारण हा बिल्डर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा या निवडणुकीत खर्च करणार आहे, अशी माहिती आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
त्र्यंबकेश्वर रोडला आपल्या सामान्य मराठी माणसांच्या घरावर बुलडोजर फिरवला. विकासाच्या नावाखाली, कुंभच्या नावाखाली. वर्षोनुवर्षे तिकडे त्यांच्या व्यवसाय आहेत, घरं आहेत त्याच्यावरती बुलडोजर फिरवून हजारो आमच्या मराठी बांधवांना बेघर केलं. अशा प्रकारचा तुघलकी कारभार या नाशिक शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावाने सुरू आहे. हे सगळं आपल्याला रोखायचं आहे. आणि त्यासाठी एकच शक्ती शिवशक्ती जी व्यासपीठावर आणि समोर उपस्थित आहे ही शिवशक्तीच हे सगळं रोखू शकेल. पण या मैदानावर जी शक्ती जमलेली आहे या शिवशक्तीमध्ये नाशिकमध्ये परिवर्तन करण्याची संपूर्ण ताकद आहे. मला खात्री आहे की, उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र आलेले आहेत हे नाशिकसुद्धा त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहील आणि आपण सगळे या नाशिकमध्ये बदल घडवेल, परिवर्तन घडवेल. आणि भ्रष्ट राज्यकर्ते ज्यांनी नाशिकची महानगरपालिका लुटली, ज्यांनी नाशिक शहर लुटलं ज्यांनी नाशिकमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लागली त्या सगळ्यांना आपण कायमचं घरी पाठवल्या शिवाय राहणार नाही, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.





























































