
बेस्ट उपक्रमाला वाचवण्यासाठी कामगार संघटना एकवटल्या आहेत. बेस्ट बसेसचे खासगीकरण रद्द करून स्वमालकीच्या बसगाडय़ांचा ताफा वाढवावा, बेस्टच्या जमिनी विकासकांच्या घशात घालू नयेत, निवृत्त कर्मचाऱ्यांची सर्व देणी तातडीने द्यावीत आदी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती आक्रमक झाली आहे. याच अनुषंगाने शनिवारी परळमध्ये कामगारांचा मेळावा होईल.
सरकार आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ‘बेस्ट’ची वाताहत उडाली आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेस्टच्या परिवहन विभागाचे खासगीकरण रद्द करून किमान 3337 बसगाडय़ांचा स्वमालकीचा ताफा राखावा, स्वमालकीच्या बस विकत घेण्यासाठी अर्थसहाय्य करावे, बेस्टच्या मालकीच्या जमिनी व इतर मालमत्ता विकासाच्या नावाखाली विकू नयेत, सेवानिवृत्त कामगारांची सर्व देणी व्याजासहित एकरकमी तातडीने द्यावी आदी मागण्यांसाठी समितीने आवाज उठवला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्या निषेधार्थ सेवानिवृत्त कर्मचारी मंगळवारी सकाळी साखळी उपोषण करणार आहेत. त्या दरम्यान सरकारने सकारात्मक चर्चा केली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी दिला.
कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
मागील अडीच वर्षांपासून बेस्ट उपक्रमातून निवृत्त झालेल्या 6 हजारहून अधिक कामगारांची अंतिम देयके रखडवली आहेत. याला सरकार व पालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. बेस्ट उपक्रम आणि कामगारांचे प्रश्न गंभीर आहेत. ते सोडवण्यासाठी कामगारांनी एकजुटीने लढण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती बेस्ट संयुक्त कृती समितीचे ज.म. कहार यांनी दिली.





























































