
स्थळ – गडकरी रंगायतनसमोर
वेळ – सायंकाळी 6 वाजता
नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील दणदणीत सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ उद्या सोमवारी ठाण्यात धडाडणार आहे. गडकरी रंगायतनसमोर सायंकाळी 6 वाजता शिवसेना–मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या प्रचारासाठी होणाऱया निवडणुकीआधीच्या सांगता प्रचारसभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलणार याकडे समस्त ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची ऐतिहासिक ठाणे नगरीत प्रथमच संयुक्त जाहीरसभा होत आहे. त्यामुळे ही सभा ‘न भूतो न भविष्यति’ अशी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ‘शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना’ हे समीकरण गेल्या अनेक वर्षांचे समीकरण आहे. आता मनसेही सोबत असल्याने ही सभा विरोधकांची दाणादाण उडवून ठाणे महापालिकेवर शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्ती युतीचा भगवा फडकवणारी ठरेल, असा विश्वास शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे व मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ठाण्यात उद्या होणाऱया दणदणीत सभेला कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई अशा विविध भागातून मोठय़ा संख्येने शिवसैनिक व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. ही सभा ठाण्याच्या राजकीय इतिहासातील ऐतिहासिक सभा ठरणार असून त्याबाबत ठाणेकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही या सभेत उपस्थित राहणार आहेत.



























































