महापालिका निवडणूक प्रचाराचा ‘सुपर संडे’

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा आज ‘सुपर संडे’ ठरला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्वच उमेदवारांनी आज आपल्या प्रभागात प्रचारफेरी काढून मतदारांचा आशीर्वाद घेतला. काँग्रेस- राष्ट्रवादी या पक्षाच्या उमेदवारांनीही आपापल्या प्रभागात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, आजचा रविवार ‘प्रचाराचा सुपर संडे’ ठरला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचारासाठी आज दिवसभर रान उठविले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भगवानदास केंगार, महादेव मगदूम, काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रचारप्रमुख शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, अशा अनेक नेत्यांनी आज पहाटेपासून रस्त्यावर मतदारांच्या गाठीभेटी घेत या ‘आम्हालाच विजयी करा’ असे आवाहन केले.

सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग तीनमधील अर्चना पॉल चोको, सुगरण मुजावर, विकास मगदूम, प्रभाग चारमधील सुमित कांबळे, प्रभाग सातमधील सोनाली कांबळे, महादेव हुलवान, प्रभाग नऊमधील हरिदास पडळकर, ओंकार देशपांडे, प्रभाग 10 मधील अनिल शेटे, प्रभाग 12 मधील पूनम मयूर घोडके, मयूर बजरंग घोडके, प्रभाग 16मधील उमर गवंडी, प्रभाग 20मधील दिया कांबळे यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

निवडणूक प्रचार काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी मंत्री आमदार जयंत पाटील, भाजपाचे विद्यमान मंत्री सांगली जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांविरुद्ध टोलेबाजी सुरू केली आहे. एकूणच प्रचारात चांगलाच रंग भरला आहे. त्यात पैशांचाही वारेमाप वापर होत असल्याची चर्चा आहे. भाजपने निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच या उद्देशाने त्यांनी जोरदार पेरणी सुरू केली आहे. मात्र, यावेळी बदल घडवायचाच या हेतूने जागृत मतदार कामाला लागले आहेत. उमेदवार पायाला भिंगरी बांधून आपल्या वार्डात फिरत आहेत.

महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या. या दोन प्रमुख नेत्यांशिवाय इतर कोणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभेचे आयोजन दिसत नाही. तरीही स्थानिक नेतेमंडळी आणि उमेदवारांनी प्रचाराचे रान उठवलेले आहे. जाहीर प्रचाराला अवघा एक-दोन दिवस उरला असल्याने सर्वच उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराचा ‘सुपर संडे’ पाहायला मिळाला. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांसाठी उमेदवारांची पहाटेपासूनच मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी लगबग सुरू होती. रविवारी चर्चमध्ये जाऊन उमेदवारांनी प्रचार तर केलाच; शिवाय ख्रिश्चन धर्मगुरूंकडून विजयासाठी प्रार्थनाही करून घेतली.