उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या वाहनाचा अपघात आईसह चालक ठार

कर्नाटकातील देवदर्शनानंतर सहकुटुंब कोल्हापूरला परतणाऱया येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मोटारीचा चित्रदुर्ग-कुलबर्गी मार्गावर रविवारी पहाटे अपघात झाला.

या अपघातात पाटील यांच्या आई कमल हरिभाऊ पाटील (वय 69, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) आणि वाहनचालक राकेश अर्जुन आयवळे (वय 39, रा. निपाणी, जि. बेळगाव) हे जागीच ठार झाले. तर पोलीस उपअधीक्षक वैष्णवी सुरेश पाटील (वय 45), कुसुम प्रल्हाद पाटील (वय 57, रा. कांदे, ता. शिराळा, जि. सांगली) आणि हवालदार उदय दत्तात्रय पाटील (वय 38) हे गंभीर जखमी झाले. या तिघांनाही चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यामध्ये वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील या कुटुंबीयांसह दोन दिवसांपूर्वी देवदर्शनासाठी कर्नाटकात गेल्या होत्या. शनिवारी रात्री बंगळुरूहून कोल्हापूरकडे येत असताना चित्रदुर्ग जिह्यातील चित्रदुर्ग-कलबुर्गी महामार्गावर त्यांच्या भरधाव वाहनाची ट्रकला मागून जोरात धडक झाली.