
मुंबई महापालिका मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना मुंबईतील जुहू परिसरात राहणाऱ्या जवळपास 35 हजार रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. जुहू परिसरात राहणाऱ्या 22 इमारतींतील रहिवाशांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. या इमारतीच्या प्रत्येक गेटवर मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे बॅनर लावण्यात आले आहेत. कायदेशीर घर असूनही आम्हाला घरातून हाकलून लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नाइलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
जुहू परिसरात मिलिटरी रडार आहे. यामुळे याचा फटका या रहिवाशांना बसला आहे. मागील 35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासापासून रखडल्या आहेत. इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नाही. त्यामुळे जवळपास 35 हजार लोक या धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहत आहेत, असेही येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील रहिवाशांनी आपल्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या असून त्याचा अनेकदा पाठपुरावाही केला आहे. एसआर0150 कायदा कालबाह्य आहे, परंतु या कायद्यामुळे आमची घरे उद्ध्वस्त होत आहेत. आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. यामुळे इथल्या 35 हजार रहिवाशांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी आम्हाला 100 वेळा विचार करावा लागेल. आम्हाला दिलेली खोटी आश्वासने आता चालणार नाही, असे या रहिवाशांनी म्हटले आहे.
नेत्यांनी फिरवली पाठ
लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी आमच्या प्रश्नांवर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणताही नेता आमच्या मदतीला धावून आला नाही. जुहू रूईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात रहिवाशांकडून मतदानावर बहिष्कार घातल्याचे अनेक बॅनर झळकावले.
निवडणुकीनंतर तोडगा काढण्याचे आश्वासन
जुहूच्या रूईया पार्क सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे अनेक बॅनर झळकले आहेत. प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश सरदेसाई यांनी येथील रहिवाशांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन या प्रश्नांचा पाठपुरावा करू तसेच योग्य तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.


























































