
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दिग्गज स्टार प्रचारक आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारदेखील प्रचार करताना दिसले. आता बॉलीवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री रवीना टंडन हीदेखील महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरली आहे. तिने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मशाल हाती घेऊन प्रचार केला. रवीना टंडन गल्लोगल्ली जाऊन मतदारांच्या दारात उभी राहून मशालीसाठी मत मागत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक 101 मधील अक्षता मेनझेस या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराने रविवारी प्रचार फेरी काढली. यात रवीना टंडनदेखील सहभागी झाली होती. रवीना चिंबई ते कांतवाडी परिसरातून काढलेल्या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात रवीना एका गल्लीमध्ये प्रचार करताना दिसते. शिवसेनेचे मशाल चिन्ह असलेला गमछा गळय़ात घालून रवीनाने गल्लोगल्ली फिरत प्रचार केला. रवीना प्रचाराला आल्याचे पाहून नागरिकांनीही मोठी गर्दी केली. रवीना कला, संस्कृती आणि समाजाच्या निगडीत मुद्दय़ांवर प्रचार करताना दिसली.
काय म्हणाली रवीना…
रवीनाने शिवसेनेच्या उमेदवारांना जास्तीतजास्त मतदान करण्यासाठी मशाल हे चिन्ह दाबावे असे आवाहन केले. ती म्हणाली, महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी जे काही प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, या गोष्टीला साथ देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. संकटकाळात ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम झाले, ते कौतुकास्पद आहे असेही ती म्हणाली.


























































