मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का? काँग्रेसचे नेते पवन खेरा यांचा सवाल, भाजपने मुंबईला धोका दिल्याचा आरोप

मुंबईतील जमीन, उद्योग व पैसा भारतीय जनता पक्ष महायुती मोठय़ा प्रमाणात एका गुजराती मित्राला देत  आहे. हा मुंबई व मुंबईकरांशी मोठा धोका आहे. मुंबई ही गुजरातच्या मित्रासाठी आहे का, याचे उत्तर महायुतीला द्यावे लागेल. मुंबईशी धोका करणाऱ्या भ्रष्ट महायुतीला मुंबईकर निवडणुकीत धडा शिकवतील, असे काँग्रेसच्या माध्यम व प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा म्हणाले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवन खेरा बोलत होते. त्यांनी भाजप महायुतीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, भाजप महायुतीने मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार करून मुंबईकरांचा पैसा लुटला आहे. कोटय़वधी रुपये खर्चूनही मुंबईकरांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. रस्त्यावर खड्डे आहेत, पिण्याचे पाणी मिळत नाही, पण पावसाळ्यात घरात पाणी शिरते. दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषण मुंबईत आहे. शाळा, बेस्ट बस, बीएमसीची रुग्णालये यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. विकासासाठी सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधी मिळाला पाहिजे, पण तो विरोधी पक्षाला दिला जात नाही. हा पैसा मोदी व अमित शहा यांचा नाही, तर जनतेचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार वर्षे का टाळल्या याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असे पवन खेरा म्हणाले.

राज ठाकरेंच्या भूमिकेचे काँग्रेसकडून समर्थन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समर्थन केले. ते म्हणाले, राहुल गांधी जे सांगत आहेत तेच काल शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष भांडवलदारांच्या विरोधात नाही पण मोदी सरकार ज्या पद्धतीने देशातील सर्वच क्षेत्रात अदानीला मुक्तहस्ते संचार करु देत आहे, ते देशासाठी अत्यंत घातक आहे, असे सपकाळ सोलापुरात बोलताना म्हणाले.

मतांसाठी लाडक्या बहिणींचे पैसे रोखले

भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला; पण मुख्यमंत्री व भाजपा या विधानाचे समर्थन करत आहेत का, हे स्पष्ट करावे. मतांच्या जोगव्यासाठी दोन महिने लाडक्या बहिणींचे पैसे थांबवून ठेवले. हे अप्पलपोटे स्वार्थी भाऊ आहेत. बहिणीला ओवाळणी टाकतात व त्या बदल्यात मते मागतात. हा जनतेचा पैसा आहे, असे मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते सचिन सावंत म्हणाले.