
जाहीर प्रचार थांबला आहे. आता भाजप, शिंदे गट घरोघरी पैसे वाटतील. भाजप सरकारने गुलामांचा बाजार मांडला आहे. पाच ते पंधरा कोटी देऊन विरोधी उमेदवारांना माघारीसाठी दबाव टाकला, आता मतदारांनाही विकत घेतील. मला पैसे वाटणाऱयांची नाही तर घेणाऱयांची चिंता आहे. तुमची मते विकू नका. आपला बाप विकला गेला असे भविष्यात मुलांना वाटता कामा नये. आम्ही कसेही वागू, आम्हाला कोण विचारणार, हा विरोधकांचा फाजील आत्मविश्वास मोडून काढून ठाण्याची सत्ता आमच्या हाती द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
देवेंद्र फडणवीस एका बाजूला विकास केला म्हणतात मग निवडणुकीसाठी त्यांना पैसे का वाटावे लागतात? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. कल्याण -डोंबिवलीत बिनविरोधासाठी भाजप आणि शिंदे गटाने पैशांची वाटलेली खैरात चिंता वाटावी अशी आहे. आता तर एका मतासाठी पाच पाच हजार वाटत आहेत. याआधी राज्यात अशी कोणतीच निवडणूक पाहिली नव्हती. सत्तेचा माज असल्यामुळे भाजपला काहीच लगाम नाही. कोर्ट, पोलीस कशाचीच भीती नाही. कुठून येतो हा पैसा, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
परप्रांतीयांचे लोंढे घुसवून शहरे ताब्यात घेण्याचा डाव
राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचा बुरखा पुराव्यासह फाडला. ते म्हणाले, दिल्लीतील दोन नेत्यांच्या तालावर नाचणाऱया राज्यातील भाजप सरकारमुळे शहरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, मीरा-भाईंदर, पालघर, वसईत परप्रांतीय मतदारांचे लोंढे घुसवून ही शहरे ताब्यात घेण्याचा भाजपचा डाव आहे. एकदा का हा प्लॅन यशस्वी झाला की ते मुंबईला हात घालतील. संकट आपल्या घराच्या उंबरठय़ावर आले आहे. कारण राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आपले मित्र, नातेवाईक या सर्वांना शहरे वाचवण्यासाठी साद घाला आणि मशाल, इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना-मनसेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
बलात्काऱयाला पायघडय़ा घालणारा भाजप
बदलापूर येथील चिमुरडीचे लैंगिक शोषण करणाऱया आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला. मात्र सह आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक करण्यापर्यंत भाजपची मजल गेली. त्यामुळे या प्रकरणात आरोपीला ठार मारण्यामागे काही गुपित होते का असा प्रश्न पडतो. मतदारांना गृहीत धरल्यामुळेच बलात्काऱयाला पायघडय़ा घालायची भाजपची हिम्मत होते. त्यामुळे पाच हजार रुपये घेऊन मते विकू नका असे कळकळीचे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
फडणवीस, शिंदे दिल्लीच्या हातातले ससाणे
दिल्लीतून आदेश येतील तसे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे वागतात. मोदी, शहांच्या हातावर बसलेले हे ससाणे आहेत. ससाणे फक्त पक्षी मारून आणायचे काम करतात तसेच फडणवीस आणि शिंदे स्वकीयांचे घात करून महाराष्ट्राची वाट लावत आहेत असा आरोपही त्यांनी केला.
विमानतळावर ढोल, लेझीमच वाजेल
महाराष्ट्रातील शहरे, पोर्ट, विमानतळ, वीज केंद्रे ताब्यात घेऊन मराठीचा ठसा पुसला जात असल्याचा पुरावाच राज ठाकरे यांनी दाखवला. गौतम अडाणी यांनी मुंबई विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावर गरबा खेळला जात असल्याचा व्हिडीओ सभास्थळी दाखवला. गणपती सणात अदानी यांनी कधी विमानतळावर ढोल, लेझीम वाजवल्याचे आपण पाहिले नाही. फक्त ही शहरे तुमची नाहीत हे दाखवण्यासाठीच हा अट्टहास आहे. मात्र 107 हुतात्मे देऊन आम्ही मुंबई गुजरातपासून वाचवली आहे. आमची भाषा, संस्कृती, स्वाभिमान आम्ही कदापि गहाण ठेवणार नाही. आमच्या स्वाभिमानाला नख लावण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेणार नाही. त्यामुळे यापुढे विमानतळावर फक्त ढोल, लेझीमच वाजेल, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.
अदानी यांच्याशी मैत्री करणाइतका मी ‘अडाणी’ नाही
मुंबईच्या सभेत सरकार आणि गौतम अडाणी यांच्या संबंधाचा बुरखा फाडल्यानंतर सरकारला मिरच्या झोंबल्या. माझ्याही घरी अडाणी आले होते असा भाजपवाले लगेच अपप्रचार करू लागले. मात्र घरी येणाऱयाला मी हाकलून देऊ का? असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर कोरडे ओढले. मुंबई, ठाणे इतकेच काय महाराष्ट्राला लुबाडणाऱयांसोबत मैत्री करण्याइतका मी ‘अडाणी’ नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपची पिसे काढली.
ठाण्यातील एक हजार एकर जंगल उद्योगपतीला देण्यासाठी शिंदेंची धडपड
एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोलच राज ठाकरे यांनी केली. ताडोबाचे जंगल जसे सरकारने खाणींना दिले तसे ठाण्यातील घोडबंदर परिसरातील एक हजार एकर जंगल एकनाथ शिंदे हे एका उद्योपतीला देणार आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी हा प्रयत्न हाणून पाडावा आणि निसर्गाचे रक्षण करावे असे आवाहनही त्यांनी केले.




























































