
साखळीत जोरदार खेळ करणाऱ्या मुंबई आणि उत्तर प्रदेश या दोन्ही संघांना विजय हजारे करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जबर धक्का बसला व कर्नाटक, सौराष्ट्रने थाटात उपांत्य फेरी गाठली. पावसाच्या व्यत्ययामुळे व्हीजेडी नियमानुसार दोन्ही सामन्यांचा निकाल लावण्यात आला. कर्नाटकने 55 धावांनी विजय मिळवला, तर अपराजित उत्तर प्रदेशला सौराष्ट्रने 17 धावांनी पराभूत केले.
आजच्या लढतीत मुंबई आणि उत्तर प्रदेश हे दोन्ही संघ हॉट फेव्हरेट होते, पण पावसाने दोघांचे आव्हान भिजवून टाकले. मुंबईत सरफराज खानपासून शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैसवालसारखे अनेक स्टार नव्हते तरीही मुंबईने शम्स मुलानीच्या झुंजार 86 धावांच्या खेळीने 8 बाद 254 अशी मजल मारून दिली आणि गतविजेत्या कर्नाटकने देवदत्त पडिक्कल व करुण नायर यांच्या संयमी, पण प्रभावी खेळीच्या जोरावर पावसाचे आगमन होण्यापूर्वी 1 बाद 187 अशा सुस्थितीत नेले. पडिक्कल-नायरने 143 धावांची अभेद्य भागी रचत मुंबईच्या आव्हानाचा चांगलाच समाचार घेतला होता. ते विजयाच्या मार्गावर होते आणि तेव्हाच पावसाचे आगमन आले. त्यानंतर व्ही. जयदेवन नियमानुसार सामन्याचा निकाल लावत कर्नाटकला विजयी घोषित करण्यात आले. कर्नाटकने या विजयासह सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली.
पडिक्कलच्या विक्रमी 700 धावा
आजचा दिवस पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केला. या प्रतिष्ठत स्पर्धेत दोनदा 700 हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. याआधी एका हंगामात 700 धावांचा टप्पा पार करणाऱया यादीत मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, नारायण जगदीशन, करुण नायर आणि स्वतः पडिक्कलचा समावेश होता. पडिक्कलने गेल्या आठ सामन्यांत नाबाद 81, 35, 91, 108, 113, 22, 124 आणि 147 अशा विक्रमी खेळ्या केल्या आहेत.
सौराष्ट्रही उपांत्य फेरीत
दुसऱया उपांत्यपूर्व सामन्यात सौराष्ट्रनेही दमदार खेळ करत उत्तर प्रदेशचा 17 धावांनी पराभव केला. यूपीने प्रथम फलंदाजी करत 8 बाद 310 अशी मजबूत धावसंख्या उभारली. अभिषेक गोस्वामी आणि समीर रिझवी यांनी प्रत्येकी 88 धावा ठोकल्या. मात्र प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा कर्णधार हार्विक देसाईने नाबाद शतक झळकावत सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा सौराष्ट्र 40.1 षटकांत 3 बाद 238 धावांवर होता. देसाईला (नाबाद 100) प्रेरेक मांकड (67) आणि चिराग जानी (नाबाद 40) यांची मोलाची साथ लाभली. दरम्यान, मंगळवारी उर्वरित दोन उपांत्य लढती खेळविल्या जाणार असून पंजाब-मध्य प्रदेश आणि दिल्ली-विदर्भ यांच्यात उपांत्य फेरी गाठण्यासाठी चुरस रंगणार आहे.




























































