महिला संचालकांच्या परिषदेत सहकारावर सखोल मंथन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नागरी सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या महिला संचालकांची दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषद नुकतीच पार पडली. कर्जतमधील नेरळ येथे झालेल्या या परिषदेत सहकाराशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मंथन झाले.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या पुढाकाराने या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत रिझर्व्ह बँकेचे सरव्यवस्थापक राजेंदर कुमार, उपसरव्यवस्थापिका पोन्नी राजी राधाकृष्णन व नाबार्डच्या सरव्यवस्थापिका स्मृती भगत यांनी उपस्थित महिला संचालकांकडून रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाविषयी सखोल माहिती दिली. अॅड. जयश्री नांगरे यांनी आर्टिफिशयल इंटेलिजन्स (एआय) व चेताली जाधव यांनी महिलांची सुरक्षितता व व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. विद्याधर अनास्कर यांनी महिला संचालकांची बँकेच्या व्यवस्थापनातील नेमकी भूमिका काय असावी तसेच बँकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी महिला संचालकांनी नेमके काय करावे याविषयी मार्गदर्शन केले. राज्य बँकेच्या सरव्यवस्थापिका सायली भोईर व नागरी बँक्स असोसिएशनच्या सीईओ सोनाली कदम याही यावेळी उपस्थित होत्या.

स्वतंत्र फोरम स्थापन करण्याचा निर्णय

या परिषदेत महिला संचालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य बँकेच्या नेतृत्वात एक स्वतंत्र पह्रम स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी अशा प्रकारची परिषद घ्यावी, अशी विनंती महिला संचालकांनी राज्य बँकेस केली.