संघ अडचणीत असताना स्वतःला सिद्ध करण्याची हीच संधी होती – सजना

 

सलग सामने आणि तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करत असताना मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा आपली विजयी मानसिकता दाखवून दिली. खेळाडूंनी शारीरिक पुनर्बांधणी, मानसिक तयारी आणि संघभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. सलग दोन सामने खेळल्यानंतर संघाचे लक्ष पूर्णपणे विश्रांती आणि मानसिक रीसेटवर होते. पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता, ज्यामुळे खूप ऊर्जा खर्च झाली, असे ऑलराऊंडर नॅट स्किव्हर-ब्रंट हिने सांगितले. मात्र, व्यावसायिक खेळाडूसाठी योग्य रितीने रिकव्हरी करणे, मन शांत ठेवणे आणि पुन्हा मैदानात सज्ज होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नॅट स्किव्हर-ब्रंट हिने स्पष्ट केले.

मागील सामन्यातील पुनरागमनाबाबत बोलताना खेळाडूंनी सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर काही काळ आत्मशंका निर्माण झाल्याचे मान्य केले, पण संघातील विश्वास आणि एकत्रित प्रयत्नांमुळे सामना शेवटपर्यंत नेण्यात यश आले. कमी धावसंख्या असूनही मुंबई इंडियन्सने गोलंदाजीत जबरदस्त लढत दिली. काही संधी हुकल्या, तरी संघाचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला.

दबावाच्या क्षणी महत्त्वाची खेळी करणारी सजीवन सजना हिने सांगितले की, ही परिस्थिती स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती. हा ५० किंवा १०० धावा करण्याचा प्रश्न नव्हता. संघाला गरज असताना योगदान देणे महत्त्वाचे होते,” असे म्हणत तिने या खेळीला वैयक्तिक पुनरागमन मानले. स्केचर्सच्या कार्यक्रमात ती बोलत होती.