
पालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपताच राज्य निवडणूक आयोगाने आज 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. निवडणूक घोषित झाल्याने संबंधित जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत मोडणाऱया पंचायत समिती क्षेत्रात लगेच आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यात कायदेशीर तसेच प्रशासकीय अडचणींमुळे या निवडणुका घेण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून मागितली होती. न्यायालयाने ती मागणी मान्य केली. त्यानंतर लगेच राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
नामनिर्देशनपत्रे ऑफलाइन पद्धतीने
महानगरपालिका निवडणुकीत ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले होते. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही आता ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील.
‘जातवैधता पडताळणी’बाबत
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱया उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते, परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल,
1 जुलै 2025 ची मतदार यादी
विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जातात. कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी जिल्हा परिषद विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय विभाजित केल्या आहेत. यातील नावे वगळण्याचा किंवा नव्याने समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात येत नाही, परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेतली आहे. संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील एकूण जिल्हा परिषदा 12
- एकूण जागा – 731
- महिलांसाठी जागा – 369
- अनुसूचित जातींसाठी जागा – 83
- अनुसूचित जमातींसाठी जागा – 25
- नागरिकांचा मागासवर्ग – 191
प्रवर्गासाठी जागा
पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
- एकूण पंचायत समित्या 125
- एकूण जागा 1,462
- महिलांसाठी जागा 731
- अनुसूचित जातींसाठी जागा 166
- अनुसूचित जमातींसाठी जागा 38
- नागरिकांचा मागासवर्ग 342
प्रवर्गासाठी जागा
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- जिल्हाधिकाऱयांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026
- नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026
- नामनिर्देशनपत्रांची छाननी – 22 जानेवारी 2026
- उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्ह वाटप – 27 जानेवारी 2026
- अंतिम उमेदवारांची यादी – 27 जानेवारी 2026
- मतदानाचा दिनांक – 5 फेब्रुवारी 2026
- मतमोजणीचा दिनांक – 7 फेब्रुवारी 2026





























































