
सिडकोतील प्रभाग 24 मध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत शिंदे गटाचा महानगरप्रमुख उमेदवार प्रवीण तिदमेविरुद्ध बोलताना व्हायरल व्हिडीओ दाखवून त्याचे समर्थक नशेबाज असल्याचा दावा केला. यामुळे संतापलेल्या संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी सभास्थळी धाव घेत महाजनांचा रस्ता अडवला, बदनामी केल्याप्रकरणी जाब विचारत राडा घातल्याने तणाव पसरला होता. यामुळे शिंदे गट व भाजपातील वाद चांगलाच पेटला आहे.
सिडकोतील प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी मंत्री गिरीश महाजन यांची सभा झाली. नाशिकमध्ये भाजपा आणि शिंदे-पवार गट आमनेसामने आहेत. मंत्री महाजन यांनी सोमवारी जाहीर सभेत शिंदे गटाचे उमेदवार, महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमेवर जोरदार टीका केली. यावेळी व्हायरल व्हिडीओ दाखवत तिदमेचे सहकारी चेतन पाटील, क्षितीज मोराडे एमडी ड्रग्ज सेवन करतात, असा आरोप केला. त्यांच्यासोबतची छायाचित्रेही दाखवली, उद्या तरुण रस्त्यावर ड्रग्ज घेतील. ही परिस्थिती नको असेल तर या उमेदवाराला पराभूत करा, असे आवाहन केले.
दहा ते बारा ठिकाणी त्यांचे एकत्रित पह्टो आहेत. ते तरुण शिंदे गटाच्या उमेदवाराला डोक्यावर घेऊन नाचतात. याची गंभीर दखल घेऊन पोलीस कारवाई करतील, असे महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, महाजन यांनी भरसभेत खोटे व्हिडीओ दाखवून बदनामी केल्याने संतापलेल्या संबंधित तरुणांच्या कुटुंबीयांनी सभास्थळ गाठले. सभा आटोपून वाहनाकडे जाणाऱया महाजन यांना अडवून जाब विचारला. पोलिसांत तक्रार देऊ, शांत बसणार नाही, असे आव्हानही दिले. निवडणूक काळात असे प्रकार करू नका असा संताप व्यक्त करीत राडा घातला. यामुळे तणाव पसरला होता. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
तिघांविरुद्ध गुन्हा
अंबड पोलीस ठाण्यात मंगळवारी शिपाई केशव ढगे यांच्या फिर्यादीवरून सुनील माधव पाटील, निशांत सुनील पाटील व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांची खोटी व्हिडीओ क्लिप दाखवून प्रचार का केला, असा सवाल करीत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा रस्ता अडवला, आरडाओरड व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


























































