
राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज करणे आश्यक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आरक्षित करून हवे असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होण्यापूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवस आधी जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाला ते चिन्हे संबंधित जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरतेच आरक्षित असेल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
किमान पाच टक्के जागांची अट
अमान्याताप्राप्त राजकीय पक्षाने मागील सार्वत्रिक निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकल्या असायला हव्यात किंवा एकूण जागांच्या पाच टक्के जागा ह्या एका जागेपेक्षा कमी येत असतील तर किमान एका जागेवर त्या पक्षाचा उमेदवार विजयी झालेला असावा. अशा पक्षाला एक मुक्त चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात आरक्षित केले जाते.
























































