
पीएमपीएल आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून टीकेची राळ उडवली जात आहे. काही लोक मनात येईल तशी आश्वासने देत आहेत; परंतु आश्वासने देताना ती पूर्ण कशी करणार याचे भान असावे लागते. ‘खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा’ अशी विरोधकांची अवस्था आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता केली.
महापालिकेतील राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील कार्यपद्धतीवर फडणवीस यांनी जोरदार टीका केली. या लोकांनी त्यांची महापालिकेत सत्ता असताना बिनडोकपणे कामे केली आहेत. पुण्यातील वाहतूक काsंडी सोडवण्यासाठी बांधण्यात आलेला युनिव्हर्सिटी चौकातील पूल पाडण्याची वेळ का आली, असा सवाल करत भविष्याचा कोणताही विचार न करता हा पूल बांधल्यामुळे तो काही वर्षातच पाडावा लागला. हे बिनडोक नियोजन पुण्याला महागात पडले. अशा प्रकारे कामाची आखणी करणाऱयांना पुण्याचे भविष्य समजलेच नाही, असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला.
तीस वर्षांत तुम्हाला शहराचा विकास दिसला नाही का?
पुणे शहराच्या विकासासाठी विरोधक कारभारी बदलण्याची भाषा करत आहेत. मात्र यांनी 25 ते 30 वर्षे महापालिकेत सत्ता असताना पुण्याची वाट लावली आहे. 30 वर्षे सत्ता असताना तुम्हाला विकास दिसला नाही का? अजितदादांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उमेदवारी दिली, अशी टीका खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली.
होय, मी बाजीरावच! – अजित पवार
होय, मी बाजीरावच आहे. त्यांनी मला बाजीराव म्हटल्याबद्दल आनंद वाटला आणि खिशात नाही आणा असे बोलून मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेच्या तिजोरीत भाजपमुळे पैसा शिल्लक राहिला नसल्याचे मान्य केले, असा जोरदार पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर केला. मोफत मेट्रो, बस प्रवासाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर सखोल विचार करून, तज्ञांचा सल्ला, राजकीय धैर्य व जनतेबद्दलच्या काळजीतून घेतलेला आहे. महापालिका फक्त उत्पन्न मिळविण्यासाठी नव्हे, तर ती नागरिकांना सेवा देण्यासाठी, लोकाभिमुख कारभार करण्यासाठी असते. आमच्या मनगटात जोर आहे. तिजोरीत आणा आणू, चांगले रस्ते व ताणतणावमुक्त जीवन यासाठी धाडसी व ठोस निर्णय घ्यावे लागतात. महापालिका निवडणुकीत आम्ही दिलेली आश्वासने हे उपकार नाहीत, आमचा जाहीरनामा पैसा उधळण्यासाठी नाही, लोकांनी भरलेला कर त्यांना योग्य स्वरूपात परत मिळावा हा त्यामागील उद्देश आहे, असे अजित पवार म्हणाले.
























































