
बदलापूर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण अतिशय दूषित झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाचे पडेल उमेदवार सुरज मुठे याने गुंडांना सुपारी दिली असून भाजपच्याच कार्यालयावर हल्ला केल्याची गंभीर घटना आज रात्री उशिरा घडली आहे. या हल्ल्यात भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष नयन मुठे हे गंभीर जखमी झाले असून कार्यालयातील खुर्च्यांची तसेच काचांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. सुरज मुठे हा नयन मुठे याचा चुलतभाऊ आहे.
बदलापूरच्या वॉर्ड क्रमांक 13 मधून सुरज मुठे हे भाजपचे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यांचे कुटुंब हे राजकारणात असून गेली वीस वर्षे जयवंत मुठे, त्यांची पत्नी मीनल मुठे हे नगरसेवक आहेत. तर नयन मुठे हेदेखील माजी नगरसेवक असून ते भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. आज रात्री आठच्या सुमारास जयवंत मुठे, नयन मुठे कार्यालयात असताना गुंड प्रवृत्तीचे सचिन पवार, काwस्तुभ शेट्टी यांनी कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप होत आहे. भाजपचा पदाधिकारी असलेल्या नयन मुठेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे हल्लेखोर आणि मुठे यांच्यात जोरदार हातापायी झाली. यात नयन मुठे हा जखमी झाला आहे.
भाईंदरमध्ये भाजप, शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
भाईंदर पश्चिमेच्या 60 फुटी रोडवर असलेल्या एका इमारतीमध्ये भाजप व शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रचार करण्यावरून सोमवारी एकमेकांना भिडले. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर भाजपचे संजीव चौहान यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीनंतर शिंदे गटाचे आशिष तिवारी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. मात्र आज भाजप आमदार नरेंद्र मेहता प्रचार संपल्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. गुन्हा दाखल करून तिवारी यांना अटक करा अशी मागणी केली. पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. अगोदर मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा, त्यानंतर गुन्हा दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली. भाजप व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमधील तू तू – मैं मैं मतदानाला काही तास उरले असतानाच चव्हाटय़ावर आल्याने भाईंदरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
























































