
अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारीला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी अहिल्यानगर प्रशासन सज्ज झाले आहे. या मतदानासाठी शहरातील 70 शाळांमध्ये 345 मतदान केंद्र उभारण्यात आली असून, यात एक पिंक व दोन मॉडेल मतदान केंद्र असणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी दिली.
अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील साई इंग्लिश मीडियम स्कूल गावडे मळा येथे पिंक मतदान केंद्र असणार आहे, तर सावेडी गाव आणि रेल्वे स्टेशन परिसरात मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत. मॉडेल मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे. मतदानासाठी येणाऱया नागरिकांना सहाय्यता केली जाणार आहे. त्यासाठी एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक सेवा देणार आहेत. मतदान केंद्रावर ज्येष्ठांना मतदानासाठी प्राधान्य दिले
जाणार आहे.
मतदान केंद्रावर आरोग्य पथक, अखंडित वीज पुरवठय़ासाठी महावितरणचे कर्मचारी, ज्येष्ठांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्री विजेची व्यवस्था, मतदान केंद्रावरती सर्वत्र सीसीटीव्हीची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत. अहिल्यानगर शहरातील मतदार बंधू, भगिनींनी लोकशाही बळकटीसाठी निर्भयपणे व कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले.
या केंद्रांवर राहणार विशेष लक्ष
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष व उमेदवारांच्या मार्फत प्राप्त झालेल्या निवेदनाचे अवलोकन केले असता, निवडणूक प्रशासनाचे जिल्हा परिषद उर्दू शाळा दर्गा दायरा मुकुंदनगर, मौलाना आझाद उर्दू शाळा मुकुंदनगर, पेमराज सारडा कॉलेज पत्रकार चौक, राधाबाई काळे महाविद्यालय तारकपूर रोड, मनपा उर्दू व मराठी शाळा बेलदार गल्ली, नागोरी मिसगर उर्दू प्राथमिक शाळा बेलदार गल्ली, सीताराम सारडा शाळा, बागडपट्टी या मतदान केंद्रावर विशेष लक्ष राहणार आहे. येथे निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रशासन दक्षता घेणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.



























































