
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान दादरमधील वॉर्ड 192 मध्ये पहिला दुबार मतदार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणुक आयोगाचा ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
मतदानाच्या पहिल्याच सत्रात मुंबईत दुबार मतदाराचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे मतदानासाठी केंद्रावर पोहोचले असता, तिथे एकाच वेळी दोन ठिकाणी नाव असलेली मतदार महिला आढळली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित महिला मतदाराला तातडीने अडवून तिच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. आधार कार्डची तपासणी करून आणि नियमानुसार प्रतिज्ञापत्र भरून घेतल्यावरच तिला मतदानाची परवानगी दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या गोंधळावर यशवंत किल्लेदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे घडल्याचा आरोप केला आहे.





























































