
निवडणूक आयोगाच्या घोळाचा नाहक फटका अनेक नागरिकांना सहन करावा लागत आहे. मतदार यादीत नाव नाही, या केंद्रावरून त्या केंद्रावर फेऱ्या मारून कंटाळलेले मतदार मतदान न करताच अखेर निवडणूक केंद्रातून घरी गेले. निवडणूक आयोगाविरोधात संताप व्यक्त करत धारावीतील शाहु नगरमध्ये अनेक मतदार मतदान न करताच परतले.
धारावीतील शाहु नगरातील मतदान केंद्रांमध्ये प्रचंड सावळागोंधळ उडाला आहे. मतदारच नाही तर, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका बसला. नागरिक मतदान केंद्रात गेले असता मतदार यादीत नावच नसल्याचे समोर येत आहे. निवडणूक आयोगाने वाटलेल्या पावत्यांमध्ये नागरिकांचे नाव एका केंद्रात आहे तर, मतदानासाठी दुसऱ्या केंद्रात जावे लागत आहे.
मतदार यादीत नाव शोधण्यासाठी या केंद्रातून त्या केंद्रातून पायपीट करावी लागत आहे. या सर्वांमुळे जेष्ठ नागरिकांसह महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. निवडणूक आयोगाच्या या कारभाराला कंटाळून मतदारांनी थेट घरची वाट धरली. मतदान करता येऊ नये, अशी यंत्रणा उभारली की काय? असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.





























































