
‘निवडणुका जिंकण्यासाठी सरकार वाट्टेल ते करत असून संपूर्ण प्रशासन सत्ताधाऱ्यांसाठी कामाला लागले आहे. कुठल्याही निवडणुकीत नव्हते ते नियम अचानक आणले जात आहेत. पैसे वाटण्याची जणू मुभाच दिली जात आहे. ही चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाहीत. असल्या फ्रॉड निवडणुकांमधून सत्ता मिळवणे याला सत्ता म्हणत नाहीत,’ असा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले.
राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मतदान प्रक्रियेतील गोंधळावर तीव्र संताप व्यक्त केला. ‘निवडणूक जिंकण्यासाठी सरकार कसे नवनव्या क्लृप्त्या वापरतेय याचा पाढाचा त्यांनी वाचला. ‘दुबार मतदानाचा मुद्दा ऐरणीवर आला, तेव्हा सुरुवातीला सरकारने हात झटकले. आमचा याच्याशी काही संबंधच नाही असे सांगितले, मग स्वतःच 10 लाख दुबार मतदार जाहीर केले. नंतर मुंबईत व्हीव्हीपॅट वापरणारच नाही असे जाहीर करून टाकले. त्यामुळे दाबलेलं बटण नेमकं त्या चिन्हावर गेलंय की नाही हे समजण्याचा मार्ग नाही,’ याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.
विरोधी पक्ष ठेवायचाच नाही असा प्रयत्न
‘विरोधी पक्ष वगैरे नावाची गोष्टी ठेवायचीच नाही. दुसऱया पक्षांनी निवडणुका लढायच्याच नाहीत. निवडणुका कशा जिंकायच्या हे सरकारच ठरवणार. विधानसभेच्या वेळी जे केले, तेच आता करण्याचा यांचा प्रयत्न आहे,’ असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ‘पाडू’ नावाच्या यंत्राबाबत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना अंधारात ठेवले आहे. पत्र पाठवून मागणी करूनही निवडणूक आयोग त्याबाबत स्पष्टता करत नाही. पूर्वी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची, आता नवे मार्कर पेन आणले. सॅनिटायजर लावल्यानंतर मार्कर पेनची ही शाई जाते अशा लोकांच्या तक्रारी आहेत. मात्र त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला काही मर्यादा असायला हव्यात,’ असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
“व्हीव्हीपॅटअभावी महापालिका निवडणुकीत दिलेले मतदान कुणाला जात आहे कळायला कोणताही मार्ग नाही. पाडू या नव्या यंत्राबाबतही आयोगाने राजकीय पक्षांना अंधारात ठेवले आहे, पत्र पाठवूनही उत्तर देत नाहीत. मतदान करा, शाई पुसा, पुन्हा मतदान करा, परत बाहेर या, शाई पुसा, हा विकास आहे का?”






























































