
अनेक राजकीय पक्षांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी करूनही बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत गुरुवारी मोठा सावळागोंधळ उडाला. मतदार याद्यांतील घोळाचा थेट फटका मतदारांना बसला. अनेक मतदारांची नावे आधीच्या मतदान केंद्रावरून हटवून दुसऱ्या केंद्रावर हलवण्यात आली होती. मात्र हा बदल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात आला नव्हता. त्यामुळे मतदारांना तासन्तास नाव शोधण्यासाठी इकडून तिकडे हेलपाटे घालावे लागले.
अनेक मतदारांच्या नावांमध्ये गंभीर चुका आढळून आल्या. या चुका निवडणूक आयोगाच्या असतानाही संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली होती. मात्र ती मागणी निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतली नसल्याचे पालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रियेतून स्पष्ट झाले.
गुरुवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी केंद्रांवर हजेरी लावली होती. अनेक मुंबईकरांनी मतदान करून वेळेत कार्यालयात पोहोचण्याचे नियोजन केले होते; मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारामुळे त्यांचे नियोजन कोलमडले. कित्येक मतदारांना पाऊण ते सव्वा तास केवळ मतदार यादीत नाव शोधण्यात घालवावा लागला.
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा-आरामनगर-२ येथील सज्जन दीपक सेन यांचे मतदार यादीतील नावच सापडेनासे झाले. विविध मतदान केंद्रांवर चौकशी करूनही जवळपास तासभर हेलपाटे घालून त्यांना नावाचा थांगपत्ता लागला नाही. निवडणूक आयोगाच्या या कारभारामुळे मतदान करण्याचा उत्साहच मावळल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
याच परिसरातील अनेक महिलांना सव्वा ते दीड तास मतदार याद्या चाळूनही नावे सापडली नाहीत. अखेर त्यांनी मतदान न करता घर गाठले. ज्येष्ठ नागरिकांनाही मतदार याद्यांतील गोंधळाचा मोठा त्रास सहन करावा लागला.
मराठी महिलेचे आडनाव केले ‘जॉन’; मतदानापासून रोखले!
वर्सोवा–यारी रोड येथील एका मराठी महिलेला निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका बसला. वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल येथील मतदान केंद्रात नोंद असलेल्या मधुरा शंकर मांडवकर यांच्या नावात ‘शंकर मधुरा जॉन’ अशी धक्कादायक चूक करण्यात आली होती. पतीचे नाव आधी आणि आडनाव पूर्णपणे वेगळे, असा गोंधळ निवडणूक आयोगाने घातला. या चुकीमुळे संबंधित महिलेला मतदानापासून रोखण्यात आले. मात्र त्यांच्या मुलाने जाब विचारल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांनी आधार कार्डची पडताळणी करून अखेर मतदानाची परवानगी दिली.
पतीचे नाव एका केंद्रावर, पत्नीचे नाव दुसरीकडे!
एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याने मतदारांना पायपीट करावी लागली. जोगेश्वरी पूर्वेकडील प्रभाग क्रमांक ७७ मधील मतदार सुभाष जांभळे यांचे नाव बालविकास शाळेतील मतदान केंद्रावर होते; मात्र पत्नी स्नेहा जांभळे यांचे नाव तेथे आढळले नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचे नाव पालिका मार्केट इमारतीतील मतदान केंद्रावर सापडले.
जोगेश्वरी परिसरात मतदार याद्यांतील गोंधळामुळे मतदारांची मोठी तारांबळ उडाली. अनेक मतदारांना मतदान न करताच माघारी फिरावे लागले.






























































