
तब्बल दहा वर्षानंतर महापालिकेसाठी आज प्रथमच प्रभाग पद्धतीने मतदान घेण्यात आले. शहरात किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान झाले. २९ प्रभागातील ११५ जागांसाठी निवडणूक रिंगणात असलेल्या ८५९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या, तर मुकुंदवाडी भागातील बोगस मतदार पकडण्यात आले. पैसे वाटप होत असल्याने गोंधळ उडाल्याने, मतदान केंद्रावर अत्यंत संथगतीने मतदान होत असल्याने काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ४३.६७टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अंदाजित सरासरी ६० टक्के मतदान झाले असल्याचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
महापालिकेसाठी तब्बल दहा वर्षांनी मतदान होत आहे. यापूर्वी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. २०१९ पासून निवडणूक न झाल्याने प्रशासक नेमण्यात आले. त्यामुळे मनपाच्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. महापालिकेसाठी २९ प्रभागातून ११५ जागांसाठी आज गुरुवारी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी ८५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. विविध राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केल्यामुळे ही निवडणूक बहुतांश प्रभागात चौरंगी झाली. आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या सत्रातच ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना घडल्या प्रभाग २६ मधील सातारा परिसरातील महाराणा प्रताप शाळेतील मतदान बूथ एकमधील मतदान मशीन बंद राहिल्याने ४० मिनिटे उशिराने सुरू झाले. प्रभाग २ मधील हडकोमधील नूतन बहुउद्देशीय शाळेत देखील ईव्हीएम बंद पडल्याची तक्रार होती. पहिल्या दोन तासात मतदान केंद्रावर काहीच गर्दी दिसून आली नाही. मात्र ९.३० बाजेनंतर मतदान केंद्राबर मतदानासाठी रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या, मतदार मतदानासाठी गर्दी करीत होते.
चार मतदान करताना मतदार गोंधळले
पहिल्यांदाच प्रभाग पद्धत असल्यामुळे प्रभागात चार मतदान करताना मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. एकाच ईव्हीएमवरील चार बटने दाबण्यात येत होती. तरीही बीपचा आवाज येत नसल्याने मतदान केंद्राध्यक्षांना मतदान कक्षातील मतदाराला जाऊन सांगावे लागत होते. त्यानंतर मतदार इतर उमेदवारांच्या ईव्हीएमवरील बटन दाबत होते. त्यामुळे मतदानाला उशीर होत होता.
संथगतीने मतदान, मतदार रांगेत ताटकळले
सातारा परिसरातील चाटे स्कूलच्या इमारतीमध्ये सात मतदान बूथ असल्यामुळे नेमके बूथ क्रमांक शोधण्यातच मतदारांचा गोंधळ उडाला. कोणत्या बुथवर मतदान आहे, हे कळत नसल्याने मतदार चकरा मारत फिरत होते. चिकलठाणा परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महाविद्यालय तसेच श्री बालाजी कनिष्ठ विद्यालय येथे सकाळी सतत रांगा लागून नागरिकांना एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागली. मतदान प्रक्रिया संथ असल्याने नागरिकांच्या रोषाचे वातावरणही काही काळ पसरले होते. उलट, एन-२ परिसरातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पावणे बारा वाजले तरी फक्त एकच मतदार आल्याचे चित्र दिसून आले. गोदावरी हायस्कूल एन-१२ मध्ये मतदान बूथ अत्यंत जवळ जवळ असल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा व गर्दी झालेली होती. हसूल गावातही मनपा शाळेच्या मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या होत्या.
पैशासाठी काही मतदार घराबाहेर पडलेच नाहीत
विठ्ठलनगर, रामनगर या भागात दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत मतदान केंद्रावर शुकशुकाट पहायला मिळाला. मतदार येऊन मतदान करून जात होते. या भागातील काही मतदारांना पैशांचे वाटप झाले नसल्याने मतदार घराबाहेर पडलेच नाहीत, अशी चर्चा कार्यकत्यांमधून ऐकायला मिळाली. त्यामुळे मतदार आणण्यासाठी लावण्यात आलेली वाहने देखील रस्त्यावर उभी असल्याचे पहायला मिळाले.
































































