
मशीन बदलल्याचा आरोप करत अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावरील मतमोजणी थांबवली होती. मशीन बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेला आक्षेप घेतला. त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली. जवळपास १ तासांहून जास्त काळ मतमोजणी बंद होती.
याबाबत रुपाली पाटील यांनी सांगितले की, प्रभाग 25 ची मतमोजणी सुरू झाली. मात्र, निवडणूक आयोगाच्या सही शिक्कानिशी मतदान मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. त्या मशीनचा नंबर असलेली प्रतही आम्हाला देण्यात आली होती. आता मतमोजणीसाठी आल्यावर त्या प्रतीवरील नंबर आणि मतदान मशीनवरील नंबर जुळायला हवे होते. मात्र, त्या नंबरमध्ये तफावत होती. 17 पैकी एकाही मशीनचा नंबर जुळलेला नाही.
कदाचित एका मशीनचा नंबर बदलू शकतो. मात्र, 17 मशीनचे कसे बदलू शकतात? असा सवालही त्यांनी केला. यावर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हा निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणा आहे. त्यांनी संगितले की, प्रतीवर प्रभाग 25 लिहिले आहे. मात्र, आतील माहिती प्रभाग 27 ची आहे. मात्रही, त्यातही तथ्य नाही. त्यांना परस्पर मशीन बदलण्याचा अधिकार कोणी दिला? आतील हा सावळागोंधळ कोणासमोरही येऊ नये, म्हणून त्यात प्रसारमाध्यमांनाही प्रवेश नाकारला आहे. तसेच आता त्यांनी ज्या मशीन उघडल्या, त्यांना सीलही नव्हते. त्यामुळे हा सर्व गोंधळ आहे. याविरोधात भाजपवगळता इतर सर्व पक्षांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे.
































































