चित्र अजून स्पष्ट व्हायचंय, मात्र भाजपकडून बहुमत मिळाल्याचं चित्र दाखवलं जातंय, जे खोटं आहे – विनायक राऊत

चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. तरी सुद्धा एकाबाजूने संपूर्ण बहुमत मिळाल्याचं चित्र भाजपकडून दाखवलं जात आहे. हे साफ खोटं आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत. मुंबईत वॉर्ड क्रमांक ८९ मधून गितेश विनायक राऊत हे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर विनायक राऊत यांनी गितेश विनायक राऊत यांच्यासह मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “आज आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने वॉर्ड क्रमांक ८९ कलिना विधानसभा येथून गितेश विनायक राऊत हे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी आज आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीत आलो होतो. आम्ही उद्धव ठाकरे यांना भेटलो. उद्या सकाळी राज ठाकरे यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. गितेश माझा मुलगा असला तरी तो बाळासाहेबांचा भक्त आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि तो आज निवडून आला आहे.”

विनायक राऊत म्हणाले की, “अजून पूर्ण निकाल येण्यास आणखी तीन ते चार तास जातील. तरी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून २२७ जागांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल नेमकं काय गौडबंगाल आहे, हे समजू शकलेलं नाही. १३ वेगवेगळ्या महापालिकेच्या विभागात फक्त दोन-दोन उमेदवारांची मतमोजणी सुरू आहे. यातील दुसरा राऊंड सुरू होण्यास १ वाजला आहे. अद्यापही बऱ्याच ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. चित्र अजून स्पष्ट व्हायचं आहे. तरी सुद्धा एकाबाजूने संपूर्ण बहुमत मिळाल्याचं चित्र भाजपकडून दाखवलं जात आहे. हे साफ खोटं आहे.”