
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या २२७ प्रभागांची मतमोजणी सुरू आहे. मात्र या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सत्ताधाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांचं झुकतं माप असल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे मुंबईत वॉर्ड क्रमांक १९० मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वैशाली पाटणकर यांना विजय घोषित करण्यात आलं होतं. मात्र नंतर भाजप उमेदवार शीतल गंभीर यांना विजय घोषित करण्यात आलं. यानंतर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार वैशाली पाटणकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची ही मागणी फेटाळली.
मिंधे गटाच्या मागणीवरून तब्बल दोनवेळा फेरमतमोजणी
दुसरीकडे मिंधे गटाचे सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया गुरव-सरवणकर यांचा वॉर्ड क्रमांक १९१ मधून पराभव झाला. येथून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या विशाखा राऊत विजय झाल्या. मात्र राऊत यांच्या विजयावर सरवणकर यांनी आक्षेप घेतला आणि फेरमतमोजणीची मागणी केली. येथील निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीवरून तब्बल एक नाही तर, दोन वेळा फेरमतमोजणीची मागणी मान्य केली. या दोन्ही वेळा फेरमतमोजणी केल्यानंतर विशाखा राऊत यांनाच सार्वधिक मते मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आलं.
मात्र वॉर्ड क्रमांक २२७ मध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचा पक्षपातीपणा समोर आला आहे. येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वैशाली पाटणकर यांना पराभूत घोषित केल्यानंतर त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. मात्र त्यांनी ही मागणी मान्य करण्यात आली नाही. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना वैशाली पाटणकर म्हणाल्या की, “माझा विजय ढापला. निकालाविरोधात मी न्यायालयात याचिका दाखल करणार.” निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मशीन बदलल्याचा गंभीर आरोप देखील वैशाली पाटणकर यांनी यावेळी केला आहे. दरम्यान, यातूनच निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला झुकतं माप दिल्याचं स्पष्ट आहे.






























































