चिन्नास्वामीत हायटेक सुरक्षा कवच! आरसीबीचा मोठा डाव, एआय कॅमेऱ्यांनी मैदान होणार अभेद्य

हिंदुस्थानच्या क्रिकेट विश्वात तंत्रज्ञानाची ताकद दाखवणारा मोठा निर्णय समोर आला आहे. आरसीबाने कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेसमोर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर तब्बल 300 ते 350 कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अर्थातच एआय पॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या निर्णयामुळे चिन्नास्वामी स्टेडियम सुरक्षा व्यवस्थेत नवे युग सुरू होणार आहे.

आरसीबीचा हा प्रस्ताव केवळ पॅमेरे बसवण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण मैदानातील गर्दी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा आहे. या प्रगत देखरेख तंत्रज्ञानामुळे गर्दीची हालचाल अचूकपणे नियंत्रित करता येणार असून रांगा सुव्यवस्थित ठेवणे, प्रवेश आणि निर्गमनावर थेट नजर ठेवणे तसेच अनधिकृत प्रवेश रोखणे अधिक प्रभावी होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चाहत्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ होणार आहे.

या प्रणालीत चित्रफीत, ध्वनी आणि मजकूर यांचे सखोल विश्लेषण करून जलद तपास आणि अधिक अचूक निर्णय घेण्याची क्षमता आहे. प्रत्यक्ष वेळेत काम करणारी एआय पॅमेऱयांची दृश्य विश्लेषण प्रणाली हिंसाचार, घुसखोरी किंवा अनधिकृत हालचाली लगेच हेरू शकते. त्यामुळे कायदा अंमलबजावणी यंत्रणांना तत्काळ आणि परिणामकारक कारवाई करणे शक्य होणार आहे.

आरसीबीने या संपूर्ण उपक्रमाचा सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च स्वतः उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. या प्रकल्पासाठी आरसीबीने या तंत्रज्ञान पंपनीशी भागीदारी केली आहे. सार्वजनिक सुरक्षेसाठी स्वयंचलन आणि माहितीवर आधारित बुद्धिमत्ता विकसित करण्याचा या पंपनीचा भक्कम अनुभव आहे.

एआयची अत्याधुनिक चेहरा ओळख प्रणाली तसेच वस्तू, गर्दी, परिसर आणि वाहनांवर बुद्धिमान नजर ठेवणारे तंत्रज्ञान आधीच अनेक राज्य पोलीस दलांना तपास आणि देखरेखीमध्ये मदत करत आहे. त्यामुळे मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी आणि मैदानाबाहेर अत्याधुनिक सुरक्षेचा किल्ला असेल.