
राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांमध्ये झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी आज जाहीर केली. त्यानुसार राज्यात एकूण 54.77 टक्के मतदान झाले. मुंबईत 52.94 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यात सर्वाधिक 69.76 टक्के मतदान इचलकरंजीत झाले, तर मीरा-भाईंदरमध्ये सर्वात कमी 48.64 टक्के मतदान नोंदले गेले.
15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान झाले. त्या दिवशी सायंकाळी निवडणूक आयोगाने मतदानाच्या टक्केवारीचा अंदाज वर्तवला होता. आज अंतिम टक्केवारीची आकडेवारी दिली. राज्यात 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदार होते. त्यातील 1 कोटी 91 लाख 3 हजार 653 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार होते. त्यातील 54 लाख 76 हजार 11 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात 29 लाख 23 हजार 412 पुरुष, 25 लाख 52 हजार 346 महिला तर 253 इतर मतदारांचा समावेश आहे.
नऊ महापालिकांमध्ये 60 टक्क्यांवर मतदान
राज्यातील नऊ महानगरपालिकांमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यात इचलकरंजी, जालना, मालेगाव, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी या महानगरपालिकांचा समावेश आहे.
अन्य महापालिकांतील मतदानाची टक्केवारी
ठाणे – 55.59 टक्के, कल्याण-डोंबिवली – 50.32 टक्के, नवी मुंबई – 57.15 टक्के, वसई-विरार – 57.12 टक्के, उल्हासनगर – 52.10 टक्के, भिवंडी-निजामपूर – 53.43 टक्के, पनवेल -55.67 टक्के, नाशिक – 56.67 टक्के, धुळे – 56.73 टक्के, जळगाव – 53.60 टक्के, पुणे – 52.42 टक्के, पिंपरी-चिंचवड – 57.71 टक्के, सोलापूर – 53.02 टक्के, छत्रपती संभाजीनगर – 59.82 टक्के, अमरावती – 54.10 टक्के, अकोला – 55.61 टक्के, नागपूर – 51.38 टक्के, चंद्रपूर – 56.89 टक्के.
मतदारसंघ एके ठिकाणी मतदान केंद्र दुसऱ्या ठिकाणी
मतदानाला जायचंय पण मतदान केंद्र कुठेय हेच स्पष्ट नसल्याने मतदारांना भलताच त्रास सहन करावा लागला. राहायला एका प्रभागात, घरातल्यांतील काहींचे मतदार तेथील मतदान केंद्रांवर तर अर्ध्या कुटुंबियांचे मतदान केंद्र दुसऱयाच प्रभागात असा सर्व सावळागोंधळ निवडणूक यंत्रणेकडून घालून ठेवण्यात आला होता.
बहुतेक ठिकाणी अशा प्रकारची गैरसोय मतदात्यांची झाली. राहायला एका प्रभागात असताना दुसऱया प्रभागात तेही लांबच्या ठिकाणचे मतदान केंद्र असल्याने नागरिकांना तंगडतोड करत तेही शोधत शोधत संबंधित ठिकाणी जावे लागले. या गोंधळामुळे मतदान आहे की निवडणूक आयोग आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेतोय, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या प्रक्रियेवर कडाडून संताप व्यक्त केला. जवळपास सर्वच ठिकाणी असे गोंधळाचे वातावरण होते. तरुणांपासून ज्येष्ठांनादेखील याचा प्रचंड नाहक त्रास झाला.































































