
नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात असलेल्या विविध कार्यालयांवर भाडेवाढीची संक्रांत येणार आहे. कार्यालयांना देण्यात येणाऱ्या जागेच्या भाडय़ात सुमारे दहा टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या पाच मजली इमारतीमधून म्हाडाचा प्रशासकीय कारभार चालतो. या इमारतीमधील 27 कार्यालये प्राधिकरणाकडून भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यात शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, राज्य महिला आयोग, नॅशनल लायब्ररी, महाराष्ट्र बँक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य अपंग विकास महामंडळ, महात्मा फुले मागास आर्थिक विकास महामंडळ आदी कार्यालयांचा समावेश आहे. सध्या येथील तळमजल्यावरील कार्यालयासाठी 530 रुपये प्रति चौरस फूट, पोटमाळ्यावरील कार्यालयासाठी 400 रुपये प्रति चौरस फूट तसेच इतर मजल्यांवरील कार्यालयासाठी 430 रुपये प्रति चौरस फूट दराने दरमहा जागेचे भाडे आकारले जाते. जागेच्या भाडय़ात आता दहा टक्क्यांनी वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे. उपाध्यक्षांची मंजुरी मिळताच नवीन भाडेवाढ लागू होणार आहे.































































