
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्रच असणार यात शंका नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच ठाण्यात अधिक लक्ष दिले असते तर निकाल वेगळा असू शकला असता असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुंबईची सत्ता आमच्याकडे नाही याचा अर्थ लढाई संपली असा होत नाही. उलट सत्ता नसताना लढ्याला अधिक धार येते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात उतरलेला एकही पक्ष सत्तेत नव्हता, तरीही 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले.
मनसेबाबत बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. आम्ही हा पराभव मानत नाही. मनसेला 10–12 जागा अपेक्षित होत्या. अनेक उमेदवार थोड्या मतांनी पडले. मुलुंड, भांडुप आणि इतर मतदारसंघांचा उल्लेख करत ते म्हणाले की, रिकाउंटिंगची संधी असूनही काही ठिकाणी त्याचा लाभ घेता आला नाही. ते पुढे म्हणाले, शिवसेना मुंबईतील मूळ पक्ष आहे. आधी आमच्याकडे 84 जागा होत्या. यावेळी 15–20 जागा कमी झाल्या. मनसेला सहा जागा मिळाल्या. अपेक्षा जास्त होत्या, पण निवडणुकांमध्ये असे घडते.
ठाण्याबाबत ते म्हणाले, आमचे लक्ष मुंबईवर अधिक होते. ठाण्यात अधिक लक्ष दिले असते तर निकाल वेगळा असू शकला असता. पण आता एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. यापुढे एकनाथ शिंदे यांची घसरण सुरू होईल. एमआयएमबाबत बोलताना राऊत म्हणाले, त्यांचे स्वतंत्र राजकारण आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत. संभाजीनगर, मुंबई आणि मालेगावमध्ये त्यांची ताकद वाढलेली दिसते.
तसेच आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रच राहणार, यात शंका नाही असेही संजय राऊत म्हणाले.

























































