
ठाणे जिल्हा हा आमचाच बालेकिल्ला आहे अशा वल्गना करणाऱ्या शिंदे गटाला भाजपने पद्धतशीरपणे चेपले आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली वगळता मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, वसई-विरार आणि पनवेलमध्ये शिंदे गटाची ताकद कमी करत भाजपने त्यांचा शक्तीपात केला आहे. शिंदेंकडे नगरविकास खाते असल्याने एमएमआरडीए त्यांच्या ताब्यात असले तरी एमएमआर क्षेत्रावर शिंदेंचा नव्हे तर आमचाच ताबा राहील हे भाजपने महापालिका निवडणुकीत दाखवून दिले आहे. दुसरीकडे धनशक्ती व झुंडशाहीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी निकराचा लढा देत हम किसीसे कम नही हे दाखवून दिले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (एमएमआरडीए) अंतर्गत मुंबईसह नऊ महापालिका आणि नऊ नगर परिषदांचा समावेश होतो. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये भाजपने पद्धतशीर खेळी करून युती तोडली आणि शिंदे गटाची ताकदच कमी करून टाकली. भाजपला शिंदे गटाने नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये आव्हान दिले. मात्र या महापालिकांमध्ये शिंदे गटाची धुळधाण उडाली आहे. उल्हासनगरात शिंदे गटाने टीम टीओके आणि साई पक्षाशी युती करूनही त्यांना भाजपने वरचढ होऊ दिले नाही. स्वतंत्र निवडणूक लढवत भाजपने शिंदेंपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणत उल्हासनगरात महापौर बसवण्याची स्वप्ने धुळीस मिळवली आहेत.
मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना फोडून शिंदेंनी १९ नगरसेवक पळवले. मात्र येथेही भाजपने युती करण्यासाठी शिंदे गटाला फक्त चार जागा घ्या, नाहीतर चालू लागा असे सुनावले होते. त्यामुळे नाईलाजाने शिंदे गट स्वतंत्र लढला. त्यात भाजपने शिंदेंचा सुपडा साफ केला. शिवसेनेचे १९ नगरसेवक फोडलेल्या शिंदेंना या निवडणुकीत मीरा-भाईंदरमध्ये अवघ्या तीन जागा मिळाल्या. भाजपने ७८ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. महत्त्वाची बाब म्हणजे शिंदे गटाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक या भागातील आमदार असतानाही भाजपने झटका देत शिंदे गटाची महापालिकेतील ताकदच नष्ट करून टाकली.
कल्याण लोकसभेत येणारी कल्याण ग्रामीणमधील १४ गावे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय फायद्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईला जोडली आणि तिथेच भाजपचे नेते गणेश नाईक यांनी शिदिंचा टांगा पलटी करण्याची शपथ घेतली. मागील महापालिकेत शिवसेनेचे ३८ नगरसेवक होते. त्यातील ३६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांनी फोडले. शिंदे यांनी नवी मुंबई जिंकण्यासाठी मोठी रसद पुरवली, परंतु गणेश नाईक यांनी भाजपचे ६५ नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवले. महापौर आमचाच असे नाईक यांनी शिंदेंना दिलेले आव्हान खरे केले आणि त्यांना विरोधी पक्षात ढकलून दिले.
पनवेलमध्ये तर भाजपने शिंदे गटाशी युती करत त्यांना अवघ्या चार जागांवर बोळवण केली. तुमची ताकदच नाही तर तुम्हाला काय देणार? असा सवाल करत जेमतेम चार जागा त्यांच्या पदरात टाकल्या. त्यातही दोन उमेदवार भाजपनेच स्वतः चे निर्यात केले होते. अवघ्या दोन जागा शिंदे गटाला मिळाल्या. पनवेलमध्ये भाजपने ७८ पैकी ५६ जागा मिळवून शिंदे गटाला सत्तेतील कोणताही मोठा वाटा मिळणार नाही हे दाखवून दिले.
अंबरनाथ, बदलापूरमध्येही कात्रजचा घाट
कल्याणपलीकडे असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांमध्ये भाजपने शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवला. या दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपने शिंदे गटाशी युती तोडली आणि स्वतःचे दोन्ही नगराध्यक्ष निवडून आणले.
वसई-विरारमध्ये भाजपने शिंदे गटाला युतीत उतरवले. भाजपने ८८ जागा घेतल्या तर शिंदे गटाला २७ जागा दिल्या. या लढ्यात बहुजन विकास आघाडीने ११५ पैकी ७१ जागा जिंकून निर्विवाद सत्ता मिळवली. भाजपने ४२ जागा जिंकल्या, मात्र भाजपची कुमक सोबत असतानाही शिंदे गटाला मात्र जेमतेम एकच जागा मिळाली. यामागचे गौडबंगाल काय याची चर्चा आता वसई-विरारमध्ये सुरू आहे. एमएमआर क्षेत्रातील हे निकाल पाहता भाजपने शिंदे गटाची ताकद वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेत त्यांची नाकाबंदी केल्याचेच समोर आले आहे.






























































