
कोल्हापूर मनपा निवडणुकीत काल झालेल्या मतमोजणीत संख्या बळाच्या आधारावर महायुतीची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले. आज सकाळी एका हॉटेलमध्ये महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि पत्रकारांशी संवाद ठेवण्यात आला होता. मात्र, महायुतीचा हा पहिलाच कार्यक्रम दिखावा ठरला. महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेल्याचे दिसून आले, तर नवनिर्वाचित नगर‘सेवकां’चे मालक झाल्याचे दिसून आले. याचा प्रत्यय आज पत्रकारांना आला.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आयोजकांकडून पत्रकारांना खुर्च्यावरून उठवून तेथे नवनिर्वाचित नगरसेवकांना बसविण्यात आले. त्यामुळे पत्रकारांमध्ये नाराजी दिसून आली. काही पत्रकारांनी निघून जाणे पसंत केले. महापालिकेत मिळालेल्या यशाची हवा महायुतीच्या नेत्यांच्या डोक्यात शिरल्याचे यानिमित्ताने दिसून आले, तर एका महाभागाने मुख्यमंत्री आमचे आहेत, असे सांगून चहापेक्षा किटली गरम असल्याचे यावेळी दाखवून दिले.
दरम्यान, ‘अलीकडच्या काळात बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक पाहायला मिळतात की, जे स्वतःला मालक समजतात,’ असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवड्य़ापूर्वी येथे झालेल्या मिसळ कट्ट्यावर केले होते. याची आठवण आज यानिमित्ताने झाली.































































