सज्जनगडावर दासनवमी उत्सवाची जोरदार तयारी सुरू

सज्जनगड येथे दासनवमी उत्सवाची तयारी जोरात सुरू असून, यावर्षी भजन, कीर्तन, प्रवचनांबरोबरच भक्तिसंगीताची सेवा सादर करण्यासाठी नामांकित गायक-कलाकारांना पाचारण करण्यात आले आहे. दि. 1 फेब्रुवारीस उत्सवाला प्रारंभ होणार आहे. 11 फेब्रुवारी हा ‘दासनवमी’ उत्सवातील मुख्य दिवस असून, दशमीला 12 फेब्रुवारी रोजी उत्सवाची सांगता होणार आहे.

उत्सव कालावधीत दररोज पहाटे काकड आरती, समर्थांच्या समाधीची महापूजा, सांप्रदायिक भजन, आरती, छबिना, तेरा मंदिर प्रदक्षिणा, भोजन प्रसाद, सायंकाळी करुणाष्टके, सकाळी व सायंआरती, छबिना, दासबोध काचन असे पहाटेपासून रात्री नऊपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी आठ ते नऊ वाजता प्रवचन आणि रात्री साडेनऊ ते 11 या वेळेत कीर्तन होणार आहे. दुपारी तीन ते सकाळी चार व चार ते पाच या वेळेत भक्तिसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत.

राज्यातील विविध नामांकित प्रवचनकार आणि कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत. उत्सवात दि. 2 फेब्रुवारीपासून सकाळी आठ वाजता प्रवचने होणार आहेत. मुख्य दिवशी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता लळिताच्या कीर्तनाने दासनवमी महोत्सवाची सांगता होणार आहे.