
सत्तेवर डोळा ठेवून शिंदे गटाने शिवसेनेतून फोडलेल्या अनेक नगरसेवकांचा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी टांगा पलटी करून त्यांना घरी बसवले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिलेदारांनी या निवडणुकीत जोरदार लढत दिली. त्याचा मोठा फटका शिंदे गटाला बसला. अनेक ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. या निवडणुकीत शिवसेनेला मोठा जनाधार मिळाल्यामुळे शिंदे गट आणि भाजपवाले हैराण झाले आहेत.
मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक शिंदे गटाने प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्यांना या महापालिकेत फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. शिंदे गटाच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जिल्हाप्रमुख राजू भोईर व त्यांच्या पत्नीला मतदारांनी घरी बसवले असून उपमहापौर प्रवीण पाटील, विरोधी पक्षनेते धनेश पाटील यांनाही मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी जोरदार लढत दिली. त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला होता. सुमारे ३० ठिकाणी शिंदे गटाच्या उमेदवारांचा टांगा पलटी झाला.
- प्रभाग क्रमांक १६ अ मध्ये शिवसेनेचे दीपेश गावंड यांना ६ हजार ८८ मते मिळाली आहेत, तर त्या ठिकाणी भाजपच्या अनिता पाटील या ७ हजार ७२८ मतांनी विजयी झाल्या आहेत. या ठिकाणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवक परशुराम म्हात्रे यांना ३ हजार ३९३ मतावर समाधान मानावे लागले आहे.
- प्रभाग क्रमांक ३ ब मध्ये शिवसेनेच्या जिल्हा संघटक नीलम ढवण यांनी जोरदार लढत दिली. त्यांना ४ हजार ४६२ मते मिळाली. याच प्रभागात भाजपच्या योगिता शर्मा या ५ हजार ३२१ मते मिळवून निवडून आल्या. शिंदे गटाच्या शीतल पांडे यांना ३ हजार ७१८ मतांवर समाधान मानावे लागले.






























































