मुंबईत उभारणार ‘बिहार भवन’, 30 मजली इमारतीसाठी होणार 314 कोटी खर्च

राज्यात नुकतीच 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेत अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. महायुती आणि शिवशक्तीमध्ये बहुमताचा 114 हा जादुई आकडा गाठण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. मराठी माणूस ठामपणे ठाकरे बंधूंसोबत राहिला. त्याच वेळी अमराठीबहुल भागातून भाजप आणि मिध्यांना बळ मिळाले, त्यामुळे 118 जागांसह महायुतीने काठावरचे बहुमत मिळवले. अशातच बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत बसलेल्या नितीश कुमार सरकारने मुंबईमध्ये ‘बिहार भवन’ उभारण्याची घोषणा केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलिफंट इस्टेट येथे हे भवन उभारले जाणार आहे. 30 मजल्यांची ही इमारत असणार असून यासाठी 314 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

मुंबईमध्ये ‘बिहार भवन’ उभारण्यासाठी नितीश कुमार सरकारने 314 कोटी 20 लाख रुपयांची निधी मंजूर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पासाठी प्रशासकीय मंजुरीला हिरवा कंदील दिला आहे. मुंबईतील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील उभी राहणारी ही इमारत 30 मजली असणार असून 0.68 एकरवर हे भवन उभारले जाणार आहे. इमारतीमध्ये राहण्यासाठी 178 खोल्या असणार आहेत.

मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईंकांची सोय इथे होणार आहे. यासाठी 240 बेडचे शयनगृहही या इमारतीत असणार आहे. तसेच या इमारतीमध्ये 233 वाहनांसाठी स्वयंचलित स्मार्ट पार्किंग (ट्रिपल/डबल डेकर) व्यवस्था केली जाईल. यासह यात 72 आसनांचा कॉन्फरन्स हॉल, इन-हाऊस कॅफेटेरिया आणि वैद्यकीय कक्षही असणार आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

89 जागा मिळूनही भाजपमध्ये असंतोष, देवाभाऊंनी मुंबई भाजपच्या नेत्यांचे टोचले कान; ठाकरे बंधूंपुढे निभाव न लागल्याची खंत