प्रयागराजच्या माघ मेळ्यात राडा, शिष्यांना मारहाण झाल्याने शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा स्नानास नकार

प्रयागराजच्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या पवित्र पर्वणीला गालबोट लागल्याची घटना उघड झाली आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीचा निषेध करत संगम स्नान न करण्याचा निर्णय घेतला आणि आपली पालखी अर्ध्यातूनच आखाड्याकडे परत नेली. उत्तर प्रदेश सरकारचे गृहसचिव मोहित गुप्ता आणि उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या शिष्यांना धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप शंकराचार्यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी हे आपल्या शिष्यांसह पालखीतून संगम घाटाकडे स्नानासाठी निघाले होते. यावेळी संगम नाक्यावर गर्दीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांशी आणि गृहसचिव मोहित गुप्ता यांच्याशी त्यांचा वाद झाला. शंकराचार्यांनी ‘आज तक’या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, प्रशासकीय अधिकारी त्यांच्या शिष्यांवर हल्ला करत असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. अशा परिस्थितीत आणि शिष्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे त्यांनी स्नान न करण्याचा पवित्रा घेतला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज शिष्यांमध्ये बाचाबाची व झटापट होताना दिसत आहे. दुसरीकडे, प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संगम नाक्यावर भाविकांची अलोट गर्दी असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शिष्यांना गटागटाने पुढे जाण्यास सांगण्यात आले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठीच ही खबरदारी घेतली गेल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मौनी अमावस्येनिमित्त प्रयागराजच्या संगम नगरीत मध्यरात्रीपासूनच भाविकांचा महासागर लोटला आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे 3 कोटींहून अधिक भाविक रविवारी पवित्र स्नान करतील. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, पीएसी, आरएएफ आणि एटीएसचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. मात्र, या अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्थेत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या सोबत झालेला हा वाद आता चर्चेचा विषय ठरला आहे.